पुणेमहाराष्ट्र

तुळजापूरच्या निकीताची ‘एमपीएससी’ परीक्षेत यशस्वी भरारी

  • हालाकीच्या परिस्थितीवर मात करून शोधला यशश्वी मार्ग
  • तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील मुलींपुढे निर्माण केला आदर्श

वडिलांच्या बोटाला धरून चार पाऊले पुढे टाकत आयुष्याची स्वप्ने पाहण्याची जी वेळ असते, त्या नाजुक वयातच वडिलांचे छत्र हरपले. कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला. त्यातच कौटुंबिक परिस्थिती मर्यादीत असताना आईने मोठ्या जिद्दीने पालन-पोषणाची जबाबदारी निभावली. त्यामुळेच आज माझे आणि भावाचे शिक्षण पूर्ण होऊ शकले. आजपर्यंतच्या आयुष्यात आईने वडिलांच्या संस्काराची कसर भरून काढली. शैक्षणिक जीवनात कोणतीही उणीव भासू दिली नाही. म्हणूनच आज मला ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवता आले, अशी माहिती तुळजापूर येथील निकीता निर्मळे यांनी सांगितली.

निकिता दयानंद निर्मळे मूळची तुळजापुर तालुक्यातील सलगरा येथील रहिवासी आहे. 2018 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 9 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत झाला. या परीक्षेत उत्तीर्ण होत (सहायक नगर रचनाकार गट-अ) निकिताने राजपत्रित अधिकारी पद प्राप्त केले. या यशाबद्दल तालुक्यात निकीताचे कौतुक केले जात आहे.

उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी प्रशालेत 10 वी पर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले. दहावीला 95.45 टक्के गुण, उच्च माध्यमिक शिक्षणात लातूर पॅटर्नचा बोलबाला असल्याने 12 वी पर्यंत शिक्षण लातूरला पूर्ण केलं. तिथेही 81.50 टक्के गुण प्राप्त केले. त्यांनतर स्थापत्य जल अभियांत्रिकी (बी.टेक) पदवीचे शिक्षण नांदेड येथे घेऊन 60 टक्के गुण मिळवले. त्यानंतर तिने MPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यात येऊन तिने MPSC सेल्फ स्टडी व क्लासेस सुरू केले.

उस्मानाबादसारख्या जिल्ह्यातून  MPSC करण्याची जिद्ध घेऊन पुण्यात क्लासेस करणे सोपे नव्हते, पण आईने सतत दिलेली साथ अन तिची ऊर्जा पाहून काहीतरी नक्की बनायचे हा आत्मविश्वास मनाशी बाळगून अभ्यासाची तयारी सुरू केली. 2016 पासून अखंडपणे सातत्यपूर्ण नियोजनरित्या केलेला अभ्यास प्रतिवर्षी काहीतरी शिकवत होता. यश खुणावत होते, पण मिळत नव्हते. 2016 च्या MPSC परीक्षेसाठी कठोर मेहनत करूनही पूर्व परीक्षेत अपयश आले. मग पुन्हा चिकाटीने तयारी सुरू केली 2017 साली पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाली. पण, मुख्य परीक्षेत अपयश आले. हा प्रवास सोपा नव्हता. पण, हार मानणं अन मागे फिरणं शक्य नव्हते, अन 2018 ला पुन्हा संधीने दार ठोठावले. एकाचवेळी दोन परीक्षा उत्तीर्ण होण्याचं भाग्य निकीताला लाभलं.

2018 ला अभियांत्रिकी अन नगररचनाकार अशा दोन परीक्षा पास झाली. पण एकाच ठिकाणी मुलाखतीसाठी जावं लागणार होतं. नगररचनाकारसाठी प्रथम बोलावणं आलं, अन मुलाखत दिली. जीवनातील तो आनंदी दिवस होता, 9 सप्टेंबर 2019 रोजी त्याचा निकाल जाहीर झाला. अन आई तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद अन सोबतच जन्मदात्या आईला ही अभिमान वाटावा असा क्षण आला. निकिताने MPSC उत्तीर्ण होत सहायक नगररचनाकार (गट-अ) अधिकारी पदावर काम करण्याचा निर्णय घेतला. निकीताने केवळ आई-वडिलांचे नाव रोषण केले नसून तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिचा आदर्श घेऊन तिच्यासारख्या असंख्य मुली यशस्वी होतील.

मुलगी निकिता 4 वर्षाची तर मुलगा प्रतीक अवघ्या 10 महिन्याचा असताना पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर 2004 पासून जिल्हा परिषदमध्ये लिपिक पदावर काम करत होते. आज पदोन्नती मिळून सहा. लेखा अधिकारी पदावर कार्यरत आहे. निकीता अन प्रतीक दोघांचा सांभाळ करत त्यांचे आवडीनुसार शिक्षण देण्याचे ठरवले होते. आज मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मनस्वी खुपच आनंद होत आहे. तिच्या यशामुळे आजवर केलेल्या परिश्रमाचे फलित झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर समाजात यशस्वी पालक होण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, पण जिद्ध,मेहनत आणि प्रामाणिकपणा सोबत असेल तर आपण केलेल्या कार्याचा निश्चितच अभिमान वाटतो.

कविता दयानंद निर्मळे, सहा.लेखा अधिकारी, जि. प. उस्मानाबाद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button