breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मुख्यमंत्र्यांकडून भाजप “निष्ठे”चा विचार; प्राधिकरण निवडीत दोन्ही आमदारांची “शिकार”

  • निष्ठावंत सदाशिव खाडे यांना मिळाला न्याय
  • पदभार सोहळ्याकडे दोन्ही आमदारांची पाठ

अमोल शित्रे

पिंपरी (महा-ई-न्यूज) – गतवर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंधेला भाजपात दाखल होऊन आयारामांनी पालिकेतील महत्वाच्या पदाची सुत्रे स्वतःकडे ठेवण्याचे डिमांड करत निष्ठावंताना निष्क्रीय ठरविले. पालिकेची सत्ता हस्तगद केल्यानंतर महत्वाची सर्व पदे आणि तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्याने निष्ठावंतांची प्रतिष्ठा केवळ बाजुच्या खुर्चीवर बसण्याचीच राहिली. परंतु, आयारामांच्या कुरघोड्यांना न घाबरता पक्षाप्रती मनातील विश्वास जपण्यासाठी या जुन्या-जाणत्या पदाधिका-यांनी जीवाचे राण केले. ही निष्ठा पाहूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली. हाडाच्या कार्यकर्त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा टिकविण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनी मात्र, पक्षाच्या दोन आमदारांची शिकार केली आहे, असा संदेश समाजात जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहरात तोळा-मासा उरलेल्या भाजपला पुनरूजीवीत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना पक्षात घेतले. मागील विधानसभेला भाजपच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर त्यांच्यावर महापालिकेत सत्ता आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी पालिकेत एकहाती सत्ता आणून दिलेला शब्द खरा करून दाखविला. परंतु, पालिकेतील प्रमुख पदांवर आमदार जगताप आणि महेशदादा लांडगे यांची दावेदारी कायम राहिली आहे. महापौर तुझा की, माझा यावरून त्यांच्यात वाद झाले आहेत. शेवटी स्थायी समिती सभापती आणि महापौर पदावर आपापल्या समर्थकांना संधी देण्याचा मार्ग काढून हा वाद मिटवण्यात आला. या वादात नसलेल्या निष्ठावंतांच्या पदरात मात्र, पक्षनेता, उपमहापौर अशी तोकडी पदे पडली. महत्वाच्या पदांसाठी निष्ठावंतांनी जोर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सफल झाला नाही. शेवटी आहे त्याच पदांवर त्यांना समाधान मानावे लागले. त्यांना आजही दबावाखालीच काम करावे लागते, ही पक्षांतर्गत वस्तुस्थिती आहे.

 

पक्षात आलेल्या नवीन नगरसेवकांना पदांचे वाटप करण्यात आले. स्वीकृतची निवड होत असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निष्ठावंत माऊली थोरात आणि अॅड. मोरेश्वर शेडगे यांना संधी मिळाली. त्यानंतर आता सदाशिव खाडे यांना कोणत्या पदावर संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मलाच संधी मिळणार, असे खाडे यांनी दरम्यानच्या काळात बोलूनही दाखविले होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निष्ठावंत म्हणून खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. त्यांनी आज शुक्रवारी (दि. 7) अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. खाडे हे माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियंत्रणाखाली पक्षाचे कामकाज केले. मात्र, प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी स्थानिक पातळीवरून त्यांची शिफारस झाली नसल्याची माहिती समजते. कामाच्या बळावर मुख्यमंत्र्यांनी खाडे यांना संधी दिली आहे. अमर साबळे यांना राज्यसभेवर खासदार केले. अॅड. सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद दिले. आता खाडे यांना प्राधिकरण अध्यक्ष पदाची संधी दिली आहे. दोन्ही पदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. त्यामुळे ही पदे पक्षाबरोबरच व्यक्तींची प्रतिष्ठा उंचावणारी ठरणार आहेत. भविष्यात भाजपला कायम सुगीचे दिवस रहावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आयारामांबरोबर जुन्यांना देखील ताकद दिल्याने पक्षाचे बळ अधिकच वाढले आहे.

 

खाडे यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास प्राधिकरण अध्यक्ष पदाचा पदभार थाटामाटात स्वीकारला. ढोल-ताशांच्या दणदणाटाने प्राधिकरणाचा परिसर दणाणून गेला होता. सर्वप्रथम  खाडे यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर वाट पाहत होते. खाडे प्रवेशद्वारातून आत येताच ढोलताशांचा आवाज घुमला. तब्बल तेरा वर्षानंतर प्राधिकरणाला अध्यक्ष मिळाल्याने प्राधिकरणाच्या हद्दीतील रहिवाशी आपले प्रश्न मांडण्यासाठी खाडे यांच्याकडे आले होते. काहींनी त्यांना प्रश्नसुध्दा विचारले.

 

आमदार जगताप, लांडगेंची नाराजी कायम?

खाडे यांच्या निवडीवरून पक्षाच्या दोन्ही आमदारांत मात्र, नाराजी असल्याचे दिसते. कारण, खाडे यांच्या स्वागत सोहळ्यात राज्यसभा खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे देखील उपस्थित राहणार होते. तसा संदेश पक्षाकडून आला होता. मात्र, खाडे यांच्या पदभार सोहळ्याला दोन्ही आमदारांची अनुपस्थिती लाभली. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी खाडे यांची निवड करताना दोन्ही आमदारांना विश्वासात घेतले गेले नसल्यामुळे दोन्ही आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. मुख्यमंत्री पुण्यात येणार असल्यामुळे दोन्ही आमदार त्यांच्याकडे गेल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे उत्तर काही पदाधिका-यांनी चाचपडत दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button