breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करा’; माजी महापौर योगेश बहल

‘स्पर्श'ला आयुक्तांचा दणका : सव्वातीन कोटींच्या वसुलीचे आदेश

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध न करता ३ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांची रक्कम लुबाडणाऱ्या ‘स्पर्श’ हॉस्पीटलला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. अदा केलेली सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिल्याने करोना काळात स्पर्श हॉस्पीटलच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची लुट केली होती हे सिद्ध झाले आहे. या आदेशानंतर राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले असून केवळ रक्कम वसुलीवर न थांबता महापालिकेची लूट करणाऱ्या स्पर्शच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

करोनाच्या कालावधीत रुग्णांना जलद आणि चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व रुग्णांना कोरंटाईन करण्यासाठी शहरातील विविध मंगल कार्यालयात कोविड सेंटरची उभारणी खासगी भागीदारामार्फत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. स्पर्श हॉस्पीटल या खासगी संस्थेला भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन ठिकाणी प्रत्येकी ३०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे आदेश देण्यात आले होते.

८ ऑगस्ट २०२० रोजी आदेश दिल्यानंतरही या संस्थेने सबंधित ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नव्हती. तसेच यासाठी महापालिकेकडे इएमडीची रक्कमही भरलेली नव्हती. ८ ऑगस्टचे आदेश असताना या हॉस्पीटलचे सीईओ अमोल होळकुंडे यांनी २५ सप्टेंबर रोजी सर्व सुविध उपलब्ध करून दिल्याचे पत्र महापालिकेला दिले होते. यानंतर भोसरी हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ५ आक्टोबर रोजी संबंधित कोविड सेंटरची पाहणी केली असता त्या ठिकाणी रुग्णांसाठीच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे लेखी कळविले होते. तर महापालिकेने कोविड रुग्ण कमी झाल्यामुळे शहरातील बहुतांश कोविड सेंटर १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे बंद केली होती.

शेवटपर्यंत रुग्णांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसतानाही १ ऑगस्ट २०२० ते ३० आक्टोंबर २०२० या ९० दिवसांच्या कालावधीचे बिल स्पर्श हॉस्पीटलने सादर केले होते. यावर तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी महापालिका आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता तसेच या कामातील अनिनियमितता बेकायदेशीररित्या ओव्हररुल करून स्पर्शला ३ कोटी २९ लाख ४० हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी इएमडी व अनामत रक्कमेपोटी काही रक्कम वजा करून स्पर्श हॉस्पीटलला ३ कोटी १४ लाख १ हजार ९०० रुपये अदा करण्यात आले होते.

हेही वाचा    –    ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरचे नेत्रदीपक यश

या अत्यंत चुकीच्या अदायगीबाबत व स्पर्श हॉस्पीटलने महापालिकेच्या केलेल्या लुटीबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना मा. उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी चौकशी केली असताना स्पर्श हॉस्पीटलने महापालिकेची लूट करण्याचे हेतूने केलेल्या अनेक अनियमितता समोर आल्यामुळे अखेर स्पर्श हॉस्पीटलला अदा केलेली संपूर्ण रक्कम ३ कोटी २९ लाख ४० हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे कोविड सेंटरच्या नावाखाली महापालिकेची स्पर्श हॉस्पीटलने लूट केल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

फौजदारी गुन्हा दाखल करा : योगेश बहल

स्पर्श हॉस्पीटलच्या संचालक आणि व्यवस्थापनाने महापालिकेची ३ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांची लूट केल्याचे आयुक्तांच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी केवळ वसुलीवर न थांबता स्पर्शच्या संचालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी महापौर योगेश बहल यांनी केली आहे. महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना अद्दल शिकविण्यासाठी आणखी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही बहल यांनी म्हटले आहे. तसेच स्पर्श हॉस्पीटलचे संचालक विनोद आडसकर यांच्या पत्नी महापालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेमध्ये नात्यातील सदस्य कार्यरत असताना ठेकेदारी करता येत नाही, हा कायदा असतानाही आडसकर यांनी या कायद्याची पायमल्ली केल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे आडसकर यांच्या पत्नीला महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही योगेश बहल यांनी केली आहे. बहल यांनी महापालिका सभेतही आवाज उठविला होता. आयुक्तांनी वरील कारवाई न केल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button