breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

प्रस्तावित ‘शिवनेरी’ जिल्हा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे – भाजपाचे आमदार महेश लांडगे ‘आमनेसामने’

पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला राजकीय ‘रंग’ : जिल्हा विभाजनापेक्षा पायाभूत सुविधा देण्याचा सल्ला

पुणे: विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी- चिंचवडलगतच्या परिसराला ‘शिवनेरी’ जिल्हा असे नाव द्यावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

नवीन जिल्ह्यावरून आता शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन जिल्हा करण्यापेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे. शिवनेरी या नावाला माझा विरोध नाही. पण ही मागणी का केली जातेय? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार कोल्हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, “शिवनेरी या नावाला माझा विरोध नाही. पण, या मागणीचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. मागणी का केली जात आहे?, नेमके पर्याय काय आहेत. याचा विचार व्हायला हवा.” पुढे ते म्हणाले, “प्रशासकीय सोयीसाठी करणार असाल तर त्यापेक्षा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती द्यावी. यामुळे जुन्नर ते पुणे अंतर कमी होऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत अर्धा तासात जाऊ शकू. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याने पायाभूत सुविधांवर ताण वाढतो आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून एक सुनियोजित शहर वसवले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. यामुळे नागरिकांचे राहणीमान उंचावेल.”

तसेच, “जिल्ह्याचे विभाजन करून प्रशासकीय सोयीसाठी मुख्यालय कुठे असणार? जागा कुठे आरक्षित होणार?, सरकारी तिजोरीवर ताण किती वाढणार? तीच ताकद पायाभूत सुविधांवर लावली तर लोकांना फायदा होईल. पुणे जिल्हा विभाजनामागे राजकीय रंग असू शकतो. प्रत्येक पक्षाची शिरूर लोकसभा मतदारसंघावर महत्वकांक्षा असणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे यात काहीच गैर नाही” असेही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

नवीन शिवनेरी जिल्ह्याच्या मागणीमुळे शिरुर लोकसभा मतदार संघासह, पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात भाजपाने नवा राजकीय ‘सुतळी बॉम्ब’ फोडल्याचे बोलले जात आहे.


आमदार लांडगे लोकसभेचे दावेदार?

पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि नवीन जिल्ह्याला ‘शिवनेरी’ हे नाव द्यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवनेरी किल्ला आहे. त्यामुळे शिव-शंभू प्रेमींच्या जिव्हाळ्याचा व अस्मितेचा विषय असलेल्या या किल्ल्याचे नाव नवीन जिल्ह्याला द्यावे अशी मागणी करीत आमदार लांडगे यांनी शिरुर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. भारतीय जनता पार्टीकडून आमदार लांडगे शिरुरचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात येईल. त्यासाठी भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून ताकद दिली जाईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button