breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Within 45 hours, the murderer was arrested : ४८ तासांत खून करणारे दरोडेखोर जेरबंद ‘पुणे एलसीबी’च्या कामगिरीचे कौतूक

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

लातूर ते पुणे या मार्गावर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचालकावर चाकूने वार करून खून केला. तसेच ट्रक चालकाकडील साहित्य दरोडा टाकून चोरून नेले. अन्य एका टेम्पोच्या काचा फोडून चालक आणि क्लिनरला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना 30 मार्च रोजी पहाटे दीडच्या सुमारास दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत सोलापूर-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणाचा छडा पुणे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या 48 तासात लावला असून दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22, रा. बोरावकेनगर, दौंड), समीर उर्फ सुरज किरण भोसले (वय 19, रा. गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काशिनाथ रामभाऊ कदम (वय 55, रा. ढोकी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख (वय 35, रा. कसबे तडवळा ता. जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कदम हे मालवाहतूक ट्रक (एम एच 25 / यु 4201)वर चालक म्हणून काम करत होते. ते लातूर येथून पुणे मार्केटयार्ड येथे डाळ घेऊन जात होते. सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत उड्डाणपुलाजवल आले असता ते लघुशंकेसाठी ट्रक बाजूला घेऊन थांबले. कदम लघुशंकेहून परत ट्रककडे येत असताना सब रोडने पायी चालत जाणाऱ्या पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्यांच्या छातीवर चाकूने वार केले. तसेच त्यांच्याकडील तीन हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेत कदम यांच्या छातीवर गंभीर इजा झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला . त्यानंतर कदम यांच्या ट्रकच्या अगोदर त्याच ठिकाणी थांबलेला टेम्पोची (एम एच 12/ एच डी 1311) केबीनची काच फोडून टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण (वय 49, रा. उस्मानाबाद) याच्या खिशातील मोबाईल व टेम्पोचा चालक अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख दोन हजार रुपये असा एकूण सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. क्लीनर पठाण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना दौंड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, दौंड एसडीपीओ ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट देवून दौंड पोलीस स्टेशन, एलसीबी व बारामती विभागाची वेगवेगळी पथके नेमून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने देखील समांतर तपास केला. एलसीबीच्या पोलिसांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर येथे जावून वेशांतर करून आरोपींची माहिती काढली.

दौंडचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्याकडील गुन्हे अन्वेषण (डीबी) पथकाची मदत घेवून पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या वस्त्या तपासण्यास सुरुवात केली. वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बनून रुग्णवाहिकेतून गेलेल्या पोलिसांनी गोपाळवाडी, पाटस रोड, दौंड येथे तपास सुरू केला. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी तब्बल दोन किलोमीटर आरोपींचा चित्तथरारक पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button