ताज्या घडामोडीमुंबई

लससक्ती मागे घेणार का ? लोकल प्रवासाबाबत आज भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबई | लोकल प्रवासासाठी लससक्ती करण्याचा तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेला आदेश कायद्यानुसार नसल्याचे कागदोपत्री दिसून येते. त्यामुळे हा आदेश मागे घेऊन सर्वानाच लोकल प्रवासाची मुभा देणार की नाही, हे मंगळवारी दुपापर्यंत स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.

कुंटे यांनी लससक्तीचा निर्णय कशाच्या आधारे घेतला, हे स्पष्ट करण्याचे आदेश देतानाच न्यायालयाने या निर्णयाबाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सुनावणीच्या वेळी लससक्तीच्या निर्णयाशी संबंधित सगळी कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. ती पाहिल्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर कृती दलाने जुलै २०२१ अखेरीस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लससक्तीची शिफारस ही लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी केली होती, लोकल प्रवासासाठी नाही, याकडे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. शिवाय अत्यंत आपत्कालीन स्थिती उद्भवल्याने राज्याच्या कार्यकारी समितीशिवाय त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दर्शविणारे कोणतेही कागदपत्र नाही, यावरही न्यायालयाने बोट ठेवले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार, मुख्य सचिवांना अत्यंत आपत्कालीन स्थितीत कार्यकारी समितीशिवाय निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी कुंटे यांच्याबाबतीत अत्यंत आपत्कालीन स्थिती काय होती, हे कुठेच नमूद नाही़ याचाच अर्थ कुंटे यांनी कृती दलाच्या शिफारशीविरोधात जाऊन हा निर्णय घेतला, असे न्यायालयाने नमूद केल़े त्यावर हा निर्णय कार्यकारी समितीचे प्रमुख म्हणून घेण्यात आल्याचा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला. मात्र, कुंटे यांनी कोणत्या आधारे निर्णय घेतला याची कुठेही नोंद नसल्याने तो कायदेशीर प्रक्रियेनुसार नसल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राज्याचा मुख्य सचिव हा काही राज्य चालवत नाही, असे ताशेरेही न्यायालयाने कुंटे यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करताना ओढले.

चूक सुधारायला हवी

राज्य सरकारकडून समंजसपणाची भूमिका अपेक्षित आहे. लससक्तीविरोधात दाखल याचिकेकडे प्रतिकूल म्हणून पाहू नये. जे झाले ते झाले, आता नव्याने सुरूवात करायला हवी, असे नमूद करताना कुंटे यांचा निर्णय कायद्यानुसार नसल्याने तो वर्तमान मुख्य सचिवांनी मागे घेण्याची सूचना न्यायालयाने यावेळी केली.

बदनामी करणारी स्थिती का ओढवून घेता ?

राज्यातील करोनाच्या स्थितीत खूपच सुधारणा झाली आहे. देशातही काही भाग वगळले तर करोनास्थिती सुधारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत करोनाची स्थिती उत्तम प्रकारे हाताळली आहे. असे असताना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नसलेला लससक्तीचा निर्णय कायम ठेवून राज्याचे नाव बदनाम करणारी स्थिती ओढवून घेत आहात, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने तोंडी आदेश देताना प्रामुख्याने म्हटले.

मुंबई, ठाण्यात नीचांकी रुग्णनोंद

मुंबई : मुंबईतील करोना रुग्णआलेख घसरला असून, सोमवारी ९६ नवे रुग्ण आढळले. १७ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच मुंबईत १०० हून कमी दैनंदिन रुग्णनोंद झाली आह़े ठाणे जिल्ह्यातही सोमवारी कमी रुग्णनोंद झाली़ जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण आढळल़े त्यात ठाणे २२, नवी मुंबई १२, कल्याण-डोंबिवली सहा, उल्हासनगरातील तीन रुग्णांचा समावेश आह़े

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button