breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मान्सूनची प्रगती का संथावली, काय आहेत कारणं? पाहा…

मुंबई : मान्सूनने या वर्षी सर्वसाधारण वेळेआधीच अंदमान-निकोबार आणि दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला होता. मात्र, सर्वसाधारण वेळेआधी प्रवास सुरू केलेल्या मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास संथावला असल्याचे दिसून येत आहे.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन कसे जाहीर केले जाते?

१० मेनंतर केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर दुसऱ्या दिवशी मान्सूनचे केरळमधील आगमन जाहीर केले जाते. पण, त्यासोबत हवामानाचे इतरही काही घटक गृहीत धरले जातात.

मान्सूनचे केरळमधील आगमन जाहीर करण्यासाठीचे इतर निकष पुढीलप्रमाणे :

– विषुववृत्तापासून ते दहा उत्तर अक्षांश आणि ५५ ते ८० पूर्व रेखांश या क्षेत्रात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी समुद्रसपाटीपासून चार किमीची उंची गाठलेली असावी.

– पाच ते दहा उत्तर अक्षांश आणि ७० ते ८० पूर्व रेखांश या क्षेत्रात जमिनीपासून सुमारे ८०० मीटर उंचीपर्यंत वाऱ्यांचा वेग ताशी २७ ते ३५ किमी इतका असावा.

– पाच ते दहा उत्तर अक्षांश आणि ७० ते ७५ पूर्व रेखांश या क्षेत्रात आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचे (जमिनीवरून अवकाशात उत्सर्जित होणारी ऊर्जा) मूल्य प्रति मीटर वर्ग क्षेत्रात २०० वॅटपेक्षा कमी असावे. याचा अर्थ त्या भागावर ढगांची पुरेशी दाटी असावी.

पाऊस, वारे आणि ढगांची दाटी आदी तांत्रिक निकष पूर्ण होत असल्यास मान्सूनचे केरळमधील आगमन जाहीर होते. १ जूनच्या आसपास मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यावर मान्सूनचा त्यापुढील प्रवास उत्तर दिशेने होतो. साधारणपणे उत्तर दिशेकडे सरकणाऱ्या पावसाच्या क्षेत्रावरून मान्सूनच्या प्रगतीची उत्तरसीमा निश्चित केली जाते.

मान्सूनची प्रगती सध्या का संथावली?

– दक्षिण गोलार्धातून विषुववृत्त ओलांडून मोसमी वारे अरबी समुद्रात दाखल झाले असले, तरी भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे येताना सध्या त्यांची दिशा वायव्येकडून आहे. ती दिशा पश्चिम- नैऋत्येकडून असेल तेव्हा मान्सूनच्या प्रवाहाला पुरेसा जोर आलेला असेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

– मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे उष्णकटिबंधीय प्रदेशात पूर्वेच्या दिशेने सरकणारे ढगांचे क्षेत्र मे महिन्याच्या अखेरीस भारतासाठी प्रतिकूल स्थितीत जाण्याचा अंदाज आहे. आठ जूनपासून हे क्षेत्र पुन्हा भारतासाठी अनुकूल स्थितीत येण्याची शक्यता असून, त्यानंतर पावसात वाढ होण्याची शक्यता विविध हवामानशास्त्रीय मॉडेल्स वर्तवत आहेत.

– आयएमडीच्या विभागनिहाय अंदाजानुसार २७ मे ते दोन जून या आठवड्यात देशातील ३६ पैकी ३० हवामानशास्त्रीय उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तीन ते नऊ जून या आठवड्यात ३६ पैकी २७ उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो. कमी पावसाच्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या सर्वच विभागांमधील राज्यांचा समावेश असेल, असे आयएमडीच्या अंदाजात दर्शवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button