breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘मी देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला शाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी जगताप’; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तुफान फटकेबाजी

कोण म्हणतं नरेंद्र मोदी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलणार आहेत?

पिंपरी : कोण म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणार आहेत?, असा सवाल करत ते तर संविधान मजबूत करत असल्याचे सांगून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी तुफान फटकेबाजी केली. चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध न केल्याने “मी देत आहे राष्ट्रवादीला शाप…”, अशा अनेक कविता सादर करून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जोरदार चिमटे काढले. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी चिंचवड मतदारसंघातील मतदारांना केले.

भाजप, शिवसेना, आरपीय व मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गुरूवारी रात्री सभा झाली. यावेळी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, रासपचे शहराध्यक्ष भारत महानवर, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

या सभेत तुफान फटकेबाजी करताना भाषणाच्या सुरूवातीलाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही कविता सादर केल्या.

“मी देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला शाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी लक्ष्मण जगताप”

“नरेंद्र मोदी आहेत साऱ्या विरोधकांचे बाप, का निवडून येणार नाहीत अश्विनी लक्ष्मण जगताप”

“देवेंद्र फडणवीस आणि मी हातात घेऊन आलोय जय भीम आणि जय महाराष्ट्रची काठी, कारण आम्ही दोघेही आहोत अश्विनीताईंच्या पाठी”

“आम्ही सारे जण आले आहोत राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी, आणि आम्ही जात आहोत अश्विनीताईंना निवडून देण्यासाठी”

कविता सादर केल्यानंतर आठवले म्हणाले, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे माणसांमधला माणूस होते. पिंपरी-चिंचवडला सुंदर बनवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे. अंत्यंत चांगला माणूस. पिंपरी-चिंचवडचा वैभव वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा होता. त्यांनी विधानसभेत पिंपरी-चिंचवडची बाजू सातत्याने मांडली. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आमच्या दलित, बौद्ध, मातंग, वंचित समाजाशी त्यांचे अंत्यंत जवळचे संबंध होते. माझा आणि त्यांचा अत्यंत चांगला परिचय होता. त्यांच्यावर अचानक पद्धतीने अशी वेळ आली. सर्वांनी अनेक प्रयत्न केल्यानंतरही ते आपल्यामध्ये राहू शकले नाहीत. अनेक उपचार केले पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही. ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले. अचानक पोटनिवडणूक लागली. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. राष्ट्रवादीने उमेदवार द्यायला नको होता. अजितदादा म्हणाले होऊन जाऊ द्या. होऊन जाऊ द्या, तर होऊन जाऊ द्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे संविधान बळकट व मजबूत करणारे नेते आहेत. त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतली आहे. बाबासाहेबांच्या संविधानानुसार भारत उभा केल्याशिवाय ते राहणार नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अशी भूमिका मांडणारे नरेंद्र मोदी आहेत. ते एकटे आणि सगळे त्यांच्यावर तुटून पडतात. पण ते संसदेत सांगतात “मैं अकेला हूँ, लेकिन करोडो जनता” माझ्या पाठीशी आहे. कोणीही कितीही शिव्या द्याव्यात, कितीही प्रयत्न करावेत. नरेंद्र मोदी हे २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत.

मोदी सरकार दलितांच्या विरोधात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत इंदू मिलच्या जागेवर एक हजार कोटीचे भव्य स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फुटाचा पुतळा असणार आहे. अनेक सुविधा असणार आहेत. लंडनमध्ये शिक्षण घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते ते घर महाराष्ट्र सरकारने खरेदी केले आहे. काँग्रेसच्या काळात असली कामे ते करत नव्हते. मी सांगत होतो पण ते माझे ऐकत नव्हते.

नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरची मोठी इमारत उभी केली. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले. अनेकवेळा बाबासाहेबांचे नाव घेणारे नरेंद्र मोदी बाबासाहेबांचे संविधान बदलतील कसे?, कोण म्हणतं नरेंद्र मोदी बाबासाहेबांचे संविधान बदलणार आहेत. बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकणार नाही. नरेंद्र मोदी या संविधानाला मजबूत करण्याचे काम करत आहेत. म्हणून या निवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना निवडून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांना सगळी मते द्यावीत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करायचे असेल तर त्यांच्या पत्नीला मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. ही जागा प्रचंड मतांनी निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button