breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शर्यतीदरम्यान पक्षाचा झेंडा फडकवत असतानाच भाजपा समर्थकांच्या घोळक्यात घुसला बैलगाडा; अन्…

रायगड |

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येऊ लागलं आहे. रायगडमध्ये सुद्धा बुधवारी म्हणजेच २ फेब्रुवारी २०२२ रोजी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत एक दुर्घटना घडली. मानवी मनोरा रचून काही भाजपा समर्थक पक्षाचा झेंडा फडकवत असतानाच भाजपा समर्थकांच्या या घोळक्यात बैलगाडा घुसल्याने तीन जण जखमी झालेत. राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर आता जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात असलं तरी येथील सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं दिसतंय. याचाच प्रत्यय रायगडमध्ये आला. बैलगाडी शर्यतीदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नसल्याचे रायगडमधील एका घटनेमधून समोर आलेय. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान अपघात झाला असून यामध्ये तीन जण जखमी झाल्याची घटना घडलीय.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला. प्रेक्षकांना आपल्या जागेवरुन पळण्याची संधीही मिळाली नाही. गाडा पाहण्यासाठी शर्यतीच्या मार्गाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांच्या घोळक्यात गाडा शिरला. नेत्यांच्या उपस्थित गाड्यांच्या समुद्रकिनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा काही भाजपा समर्थक प्रेक्षक मानवी मनोरा रचून भाजपाचा झेंडा फडकावत होते. मात्र शर्यतीमधील एक बैलगाडा थेट या समर्थकांवर गेला. यामध्ये काहीजणांना गाड्याच्या चाकामुळे किरकोळ दुखापत झाली तर काहींनी अगदी शेवटच्या क्षणी तिथून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले. त्याचदरम्यान अन्य एक बैलगाडीचे बैल उधळले व सैरवैर पळू लागले, त्यामुळे बैल गाडी मालक जखमी झाला. तसेच दोन प्रेक्षक देखील जखमी झाले आहेत. “त्या घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी नव्हतो. बैलगाडी शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी सात वर्षांपासून सर्वच पक्ष प्रयत्न करत होते. जनभावनेचा विचार करुन माननिय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या स्पर्धांना सुरुवात झाली. कालची स्पर्धा ही जिल्ह्यामधील कमी कालावधीत आयोजित केलेली स्पर्धा होती. या स्पर्धेला उस्फुर्तपणे जमलेला जनसमुदाय आणि उपस्थिताच्या भावना व उत्साहामुळे ही घटना घडली. यासाठी आयोजकांना दोषी धरता येणार नाही. अनावधानाने हा सर्व प्रकार घडला. पण यापुढे या घटना घडू नयेत यासाठी काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले सर्व निर्देश, अटी-शर्थीचं पालन निश्चितपणे केलं पाहिजे असं माझं मत आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते यांनी दिलीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button