TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गव्हाच्या दरात मार्चपर्यंत तेजी

पुणे : रशिया-युक्रेन युद्धामुळे गहू, गव्हाचे पीठ, रवा, मैद्याची विक्रमी निर्यात झाल्यामुळे देशात गव्हाचा साठा सरासरीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात तेजी आली आहे. सध्या बाजारात गव्हाचे दर सरासरी ३५ ते ४० रुपये प्रति किलो आहेत. नव्या गव्हाची आवक एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून सुरू होईल, तोपर्यंत दरात तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

जागतिक घडामोडी, प्रथम लांबलेला आणि नंतर मुसळधार पडलेल्या मोसमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि जागतिक बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी गहू, गव्हाचे पीठ, रवा, मैद्याची केलेली प्रचंड निर्यात आदी कारणांमुळे देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात तेजी आहे. सध्या गव्हाचे दर ३५ ते ४० रुपयांदरम्यान आहेत. दरातील ही तेजी नव्या हंगामातील गहू बाजारात येईपर्यंत कायम राहील, अशी माहिती व्यापारी, निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.

संरक्षित साठा कायम

एक ऑक्टोबरअखेर भारतीय अन्न महामंडळासह (एफसीआय) सरकारच्या अन्य यंत्रणांकडे २२७ लाख टन गव्हाचा संरक्षित (बफर)साठा आहे. देशात सरासरी संरक्षित साठा २०५ लाख टन इतका असतो. मागील वर्षी हाच साठा ४३८ लाख टन इतका होता. त्यामुळे देशात गव्हाचा कसल्याही प्रकारचा तुटवडा नाही, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

लागवडीत मोठी वाढ?

देशभरात मोसमी पाऊस चांगला झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देशात गव्हाच्या लागवडी खालील क्षेत्रात मोठी वाढ होईल, असा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण खात्याने व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामात देशभरात ५४ हजार हेक्टरवर गव्हाची लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवड क्षेत्रात किमान दहा टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात युरियासह डीएपी खतांची उपलब्धताही चांगली आहे. त्यामुळे उत्पादकता चांगली राहण्याचा अंदाज आहे.

देशात गव्हाची कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. नवा गहू बाजारात येईपर्यंत देशातील जनतेला पुरेल इतका गहू देशात शिल्लक आहे. जून-जुलै महिन्यात गव्हाचे दर ४० ते ४५ रुपयांवर गेले होते, ते आता ३५ ते ४० रुपयांवर आले आहेत. हाच दर आता कायम राहील. गव्हाचे दर फारसे कमी होणार नाहीत. – राजेश शहाव्यापारीनिर्यातदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button