Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

काल ठाकरेंसाठी ढसाढसा रडले, आता एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रेट्यापुढे कसेबसे १६ आमदार थोपवून धरलेल्या शिवसेनेला सोमवारी सकाळी आणखी एक धक्का बसला. अगदी कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे दिसत आहे. कारण, अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदे गटात दाखल झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. संतोष बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत बसमध्ये चढताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अगोदरच विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अधिकृत गटनेता आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली होती. त्यामध्ये आता आणखी एक आमदार साथ सोडून गेल्याने शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

शिवसेनेचा एक एक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुहावाटीला जात असताना संतोष बांगर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यामागे उभे पाहिले. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेचे कळमनुरीसह राज्यात कौतुक झालं. शिवसेना कार्यकर्त्यांनी तर डोक्यावर घेतलं. संतोष बांगर यांनीही आपल्या मतदारसंघात भावनिक भाषणं ठोकली. अगदी ‘बंडखोर आमदारांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांनाही बायका मिळणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी राजन साळवी यांच्याबाजूने मतदान केलं. रात्री काही सुत्रं फिरली आणि आज ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांसोबत विधानभवनात आले. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. कालपर्यंत ठाकरेंसोबत असणारे संतोष बांगर आज शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेना आणि खास करुन उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का मानण्यात येतोय.

बंडखोरांना सडके टमाटे आणि अंडी फेकून मारा-बांगरांची भाषणं

बंडखोर आमदार येतील तेव्हा सोडू नका. त्यांचं स्वागत सडके टमाटे आणि अंडे फेकून करा, त्यांना सोडून नका. बंडखोरी केल्याने त्यांचं तोंड आधीच काळं झालं आहे, अशी भाषणं दरम्यानच्या काळात संतोष बांगर यांनी केली.

भावनिक भाषणं करुन बांगर यांनी हिंगोलीच्या शिवसैनिकांची मनं जिंकली होती

अडचणीच्या काळात संतोष बांगर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने कळमनुरीच्या शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं. यावेळी बांगर कमालीचे भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी अश्रू ढाळले. आज मी शिवसेनेसोबत आणि ठाकरेंसोबत आहे, म्हणून शिवसैनिकांनी माझं जोरदार स्वागत केलं, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पण मी जर बंडखोरांसोबत गेलो असतो तर माझी अवस्था काय झाली असती. मी शिवसेनेत आहे म्हणून मला किंमत आहे, नाहीतर माझी लायकी काय? अशा आशयाची भाषणं करुन संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या शिवसैनिकांची मनं जिंकली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button