breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे’; सुनील देवधर

पुण्यात "तिसऱ्या पर्वाकडे..." या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर माझी जन्मभूमि आणि आता कर्मभूमि बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे आहे, आणि हे सर्व आपणा सर्वांच्या सोबत मिळून करायचे आहे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले.

सुनील देवधर यांचे मोठे बंधू आनंद देवधर यांनी लिहिलेल्या व चंद्रकला प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “तिसऱ्या पर्वाकडे…” या पुस्तकाचे प्रकाशन, पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, २८ जानेवारी रोजी झाले.

यावेळी मंचावर भाजप नेते सुनील देवधर, माजी खासदार प्रदीप दादा रावत, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी, लेखक आनंद देवधर व चंद्रकला प्रकाशनच्या शशिकला उपाध्ये आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास पुणेकर पुस्तकप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कॉंग्रेसने या देशाला ६०-६५ वर्षे लुटले असून, केवळ भोगवस्तू मानून खुर्चीचा उपभोग घेतला, तर पदाच्या खुर्चीचा देशासाठी उपयोग करणारे व्यक्ती अटलबिहारी वाजपेयी होते आणि त्यांच्यानंतर देशासाठी या उपयोगाची पराकाष्ठा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”, असे देवधर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांस्कृतिक राष्ट्रवादाला धरून, देशासाठी काम करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठ्या संख्येने मंदिरांचे जिर्णोद्धार केले. त्यांच्यानंतर मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य नरेंद्र मोदी करत असल्याचे देवधर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा – ‘आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही’; देवेंद्र फडणवीसांनी मांडली भाजपची भूमिका

यावेळी बोलताना माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले की, ” मोदींनी देशवासियांमध्ये स्वत्वाची जाणीव करून दिली. त्यांचे नेतृत्व प्रामाणिक व पारदर्शक आहे. तिसरी आर्थिक महासत्ता बनण्याची क्षमता देशात आहे. हे आव्हाने सोपे नाही, परंतु नरेंद्र मोदी ही आव्हाने कमी वेळात हाताळू शकतील…”

ते पुढे म्हणाले कि, “काँग्रेसने विकासाला समाजवादी विचारांचे साखळदंड घातलेले होते, त्यामुळे त्यांच्या काळात विकास झाला नाही. मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार बहुमताने निवडून देण्याची गरज आहे. आजही विकास कामात व चांगल्या गोष्टीत अडथळे आणणाऱ्या व्यवस्था, शक्ती या देशात कार्यरत आहेत. ही विकासकामे रोखणारी अनेक जुनी धोरणं आहेत, जी बदलण्याची गरज आहे, ती धोरण बदलण्यासाठी बहुमताची गरज आहे.”

तर यावेळी बोलताना सुशील कुलकर्णी म्हणाले की, “राष्ट्र हे तेव्हाच घडते, जेव्हा त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची अस्मिता जागी होते. मोदी हे राजधर्माचे पालन करणारे नेते असून, त्यांनी भारतीय नागरिकांची अस्मिता जागी केली आहे. मागील दहा वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वात भारत अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. आपल्या आजूबाजूचे देश आणि त्यांची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असताना, भारत मात्र जगातला सर्वात शक्तिशाली देश होण्याकडे अत्यंत वेगाने वाटचाल करत आहे. हे मोदींच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे यश आहे.

आपल्या देशाच्या हिताच्या अनेक गोष्टी झालेल्या असल्या तरीही अजून बऱ्याच गोष्टी होणे बाकी आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात तिसरे पर्व ही त्यांची नसून, आपल्या सारख्या प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांची व देशाची ती गरज आहे”, असे मत सुशील कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.

“मोदीजी म्हणतात की, मी केवळ चार जाती मानतो, शेतकरी, युवा, महिला आणि गरीब! त्यामुळे मागील पावणे दहा वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी यांनी ज्याकाही योजना आखल्या, त्या या वर्गासाठी आहेत. अंत्योदयाचा विषय प्रत्यक्षात राबवण्याचे कार्य, नरेंद्र मोदी करत आहेत.” असे विचार लेखक आनंद देवधर यांनी आपल्या प्रस्तावनेत मांडले.

कार्यक्रमास जनसेवा बँकेचे संस्थापक वसंतराव देवधर, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्रा. जोत्स्ना एकबोटे, यांचीही उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button