breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“आम्ही इथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो”; कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेक प्रकरणी खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई |

सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी पुन्हा दिसून आली. महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर त्यांनी शाई फेकली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू झाले आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांना चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले होते.

“महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर ज्याप्रकारचा हल्ला झाला त्याचा फक्त महाराष्ट्र सरकारने निषेध करुन चालणार नाही. सातत्याने तिथे मराठी बांधवांवर, समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतात. आम्ही इथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो. सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. जे दोन मंत्री सीमाप्रश्नासाठी खास नेमलेले आहेत त्यांनी बेळगावला जावून समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

“या घटनेला जबाबदार बेळगावची मराठी जनता सुद्धा आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकजूट दाखवली नाही. भाजपाला विजयी केले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्रव्देष्ट्यांचे बळ वाढले आणि त्यातून असे हल्ले सुरु झाले आहेत. हा बेळगावसह सीमाभागातल्या मराठी माणसाला धडा आहे. कालची घटना महाराष्ट्रासाठी वेदनादायक आहे. महाराष्ट्र सरकारने त्याविषयी कठोर पावले उचलायला हवीत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी त्यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी निषेधार्थ मंगळवारी आयोजित केलेल्या बेळगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासूनच बेळगावसह उपनगर, सीमाभागातील व्यवहार कडकडीत बंद होते. अनेक मंडळांनी फलकावर बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button