ताज्या घडामोडीमुंबई

परळ, वरळी, चेंबूरमध्ये प्रभागवाढ? शिवसेनेला लाभ होण्याची शक्यता

मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील नऊ प्रभाग वाढणार असून हे नवीन प्रभाग भायखळा, वरळी, परळ, दहिसर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर या परिसरांत वाढणार आहेत. मंगळवारी प्रभागवाढीबाबतचा नवीन आराखडा जाहीर होणार आहे. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती देता येणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या विभागांमध्ये हे प्रभाग वाढणार आहेत.

महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याच्या दृष्टीने प्रभाग पुनर्रचना आराखडा प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने नुकत्याच मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. नक्की कोणत्या वॉर्डात हे प्रभाग वाढणार याबाबत पालिका व राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसंख्यावाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने दिवाळीपूर्वी घेतला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची म्हणजेच नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे. नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढणार आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये वाढणार आहेत, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, तर पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत प्रभाग वाढणार आहेत.

प्रभागवाढीचा हा आराखडा मंगळवारी पालिकेच्या संकेतस्थळावर, वर्तमानपत्रात जाहीर होणार आहे. तसेच विभाग कार्यालयांतही प्रभागांचे नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेत सध्या २२७ प्रभाग असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १०२ प्रभाग हे पश्चिम उपनगरात आहेत. पालिकेच्या निवडणुकीत मुख्य चुरस ही शिवसेना व भाजपमध्ये होणार असून शिवसेनेला २०१७ च्या निवडणुकीत शहर आणि पूर्व उपनगरात भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button