breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : ‘माणुसकी’च्या हातांनी पेटविल्या शेकडो घरातील चुली; गडाळे परिवारातर्फे ‘एक हात माणुसकी’चा उपक्रम

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शेकडो जीव घेणार्‍या ‘करोना’च्या अंधःकारामुळे कित्येक गोरगरिबांच्या चुलीही विझवल्या. गरिबांच्या घरातील लहानथोरांना उपाशी ठेवले. हातावर पोट असणार्‍या गरीब कुटुंबाच्या हालाची तर कल्पनाच न केलेली बरी! मात्र, अशा संकटकाळातही ‘माणुसकी’चे नाते निभावणारे अनेकजण समाजात दिसतात. पुण्यातील गडाळे परिवारानेही करोना संकटाच्या या कठीण काळात ‘माणुसकी’च्या हातांनी शेकडो गरिबांच्या चुली पेटविल्या.

करोनाच्या संकटामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या स्थितीत गोरगरीबासह सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर आर्थिकसंकट कोसळले आहे. अनेकांच्या घरातील अत्यावश्यक साहित्य संपल्याने चुली बंद राहू लागल्या आहेत. या संकटाच्या काळात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात गडाळे परिवार ‘एक हात माणुसकी’च्या नात्याने मदतीला धावून आले आहे. शेकडो कुटूबियांच्या घरातील चुली पेटवून मदतीचा हातभार लावला आहे. दरम्यान स्वखर्चाने पोलिसांना फेसशिल्ड, मास्क आणि नागरिकांना धान्य, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील रविवारपेठ, गणेशपेठ, बुधवारपेठ आदी परिसरात संकट समयी सामाजिक बांधिलकी जोपासत गडाळे परिवार समाजातील गरजू घटकांच्या मदतीला धावून आले आहे. करोना संकटामुळे सर्वसामान्य घरातील चुली पेटवण्यासाठी त्यांनी एक हात माणुसकीचा पुढे केला आहे.

शेकडो सर्वसामान्य कुटूबियांना धान्य आणि किराणा साहित्याचे एकत्रित किट बनवून वाटप केले आहे. यामध्ये पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक किलो तेल, शेंगदाणे चटणी, लोणचं बॉटल व मास्क, कापडी पिशवी दिली आहे. तसेच समाजाची सुरक्षा करणार्‍या पोलिसांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप केले आहे.

माजी नगरसेविका सुनंदा सतीश गडाळे, युवक नेते तेजस विजय गडाळे, तुषार गडाळे, गौरी सणस यांच्याकडून नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही गरजू कुटुंबियांना हे साहित्य वाटप करणार असल्याचे तुषार गडाळे आणि मित्र परिवाराकडून सांगण्यात आले आहे. तुषार गडाळे आणि मित्र परिवाराच्या औदार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button