breaking-newsमुंबईराजकारण

विनायक मेटेंचा घात की अपघात? मेटेंच्या पत्नीकडून महत्त्वाचा खुलासा

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात नेमका कोणत्या ठिकाणी झाला, ही गोष्ट चालक सांगू शकत नव्हता. एकनाथ कदम हा चालक आमच्याकडे अनेक वर्षांपासून कामाला आहे. आमच्या गाडीवर असणाऱ्या चालकांना महाराष्ट्रातील रस्त्यांची खडानखडा माहिती आहे. त्यामुळे मेटे साहेबांच्या (Vinayak Mete) अपघातानंतर चालक एकनाथ कदम याला अपघाताची नेमकी जागा सांगता न येणं, ही बाब खटकणारी असल्याचे वक्तव्य विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सांगितले. ज्योती मेटे यांनी मंगळवारी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी विनायक मेटे यांच्या अपघातामागे अनेक संशयास्पद गोष्टी असल्याचे सांगितले.

मुळात अपघात कुठे आणि केव्हा झाला, हे कोणीच आम्हाला सांगत नव्हते. मी गाडीच्या ड्रायव्हरशी बोलले, पण तोदेखील अपघात कुठे झाला हे सांगू शकला नाही. गेल्या काही वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे. बीड ते मुंबई मार्गावर तो सातत्याने गाडी चालवतो. आमच्या सर्व ड्रायव्हर्सना फक्त हाच मार्ग नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील रस्त्यांची खडानखडा माहिती आहे. त्यामुळे अपघात नेमका कुठे झाला, हे ठिकाण कळू न शकणे, ही बाब खटकणारी आहे.

तसेच मी स्वत: डॉक्टर आहे. मेटे साहेबांच्या मृत्यूची जी वेळ सांगितली जात आहे, त्यापेक्षा त्यांचा मृत्यू आधीच झालाय, हे मला तेव्हाच कळालं होतं. त्यामुळे मला सत्य दडवले जात आहे, असे वाटत होते. या सगळ्यात कोणतातरी एक दुवा हा गायब आहे. मी बीडमध्ये घरी गेले तेव्हा घरच्यांना ही गोष्ट बोलूनही दाखवली. आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत आहे. काही कच्चे दुवे आहेत, त्यांची संगती लागत नाही. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक असणाऱ्या एकनाथने अपघात झाल्यानंतर आम्हाला फोन करण्याऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता. त्याने असं का केलं, हेच कळत नाही. कदाचित त्याने पोलिसांना फोन केलाही असेल, असे ज्योती मेटे यांनी म्हटले.

त्यांच्या हाताला नाडीचे ठोके लागले नाहीत अन् माझी शुद्ध हरपली: ज्योती मेटे

ज्योती मेटे यांनी अपघातानंतर रुग्णालयात काय झाले, याचा वृत्तांत कथन केला. मला बीडमधून मेटे साहेबांचा अपघात झाल्याचा फोन आला. त्यानंतर मी मुंबईतून कामोठे येथील रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी माझ्या मनात हा अपघात आहे की घातपात, याचा कोणताही विचार नव्हता. मी फक्त मेटे साहेबांच्या प्रकृतीची काळजी करत होते. मी रुग्णालयात जेव्हा त्यांच्या नाडीचे ठोके तपासले तेव्हा मला पल्स लागली नाही. त्यानंतर माझ्या सर्व संवेदना हरपल्या, असे ज्योती मेट यांनी म्हटले. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरने पोलिसांना फोन करण्याऐवजी बीडमधील लोकांना कळवले. त्याऐवजी त्याने पोलिसांना किंवा वैद्यकीय मदतीसाठी फोन का केला नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांना समाधानकारक उत्तरे देत नसेल तर या प्रकाराची खोलपर्यंत चौकशी झाली पाहिजे. मला अपघाताची माहिती मिळाली तेव्हा मी मुंबई आणि रायगड परिसरातील आमच्या ओळखीतील लोकांना फोन केले. जेणेकरून ते मेटे साहेबांपर्यंत मदत पोहोचवू शकतील. घरातून बाहेर पडेपर्यंत मी व माझी मुलगी फोनवर बोलत होतो, असे ज्योती मेटे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button