ताज्या घडामोडीमुंबई

विजय मल्ल्या, निरव मोदी, चोक्सीला दणका!

१९,००० कोटींची संपत्ती जप्त

मुंबई | भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या, हिरे व्यापारी निरव मोदी आणि त्याचा मेहुणा मेहुल चोक्सी याची १९ हजार १११.२० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. मनीलॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार १५ मार्च २०२२ पर्यंत ईडीने ही कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले. या कारवाईमुळे तिघांना मोठा दणका बसला आहे.

मल्ल्या, मोदी आणि चोक्सीने भारतीय बँकांकडून सुमारे २२ हजार कोटींची कर्जे घेतली होती. त्यानंतर ती न फेडता पैसे बुडवून ते परदेशात पळून गेले. त्यांच्या विरोधात स्टेट बँकेच्या नेतृत्त्वाखाली बँकांच्या समूहाने ईडीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत त्यांची १९ हजार १११.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यातील १५ हजार ११३.९१ कोटी सार्वजनिक बँकांना परत केले आहेत, तर ३३५.०६ कोटींची मालमत्ता सरकारने ताब्यात घेतली, अशी माहिती चौधरी यांनी दिली. या प्रकरणात त्यांनी बुडवलेल्या एकूण कर्जापैकी ८४.६१ टक्के रक्कम जप्त केली आहे. बँकांना झालेल्या एकूण नुकसानापैकी ६६.९१ टक्के पैसे बँकांना परत केले आहेत. मल्ल्या, मोदी आणि चोक्सीने बँकांचे सुमारे २२ हजार ५८५.८३ कोटींचे नुकसान केले आहे. त्यापैकी १९ हजार १११.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या तिघांकडून १८ हजार कोटी वसूल करून बँकांना परत केले असल्याची माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयालाही यापूर्वी दिली होती, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये राहतो. तो सध्या जामिनावर आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मल्ल्याने ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवले असून निरव मोदी आणि मेहुल चोक्सीने १३ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गंडा बँकांना घातला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button