breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Unlock 3.0 : राज्य सरकारच्या परवानगीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नियमावली जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्य सरकारच्या अनलॉक 3.0 मधील आदेशाला अनसुरून पिंपरी-चिंचवड शहरातील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महापालिकेने देखील पिंपरी-चिंचवड शहरासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शनिवार (दि . 1) पासूनच दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकाने खुली ठेवता येतील. परंतु फुड कोर्ट, रेस्टॉरंट मात्र बंद राहतील. मात्र, त्यांना ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊसमध्ये 33 टक्क्यांच्या मर्यादित निवास व्यवस्थेला परवानगी दिलेली आहे. ज्या हॉटेल्समध्ये संस्थात्मक अलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण केले जात असेल तेथे 100 टक्के निवास व्यवस्था करता येईल. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे सुधारित आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार, हॉटेल किंवा लॉजिंगमधील रेस्टॉरंट, कॅन्टीनची सोय केवळ तेथे निवासी राहणाऱ्या प्रवाशांसाठीच सुरू राहील. क्रीडा संकुल, स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे, महापालिकेची मैदाने व उद्याने, संस्था / सोसायटीची मैदाने, उद्याने नागरिकांसाठी खुली राहतील. तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळण्याच्या खेळांना परवानगी असेल. ही परवानगी सकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेतच असेल.

गोल्फ, फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, आऊटडोअर बॅडमिंटन, मल्लखांब आदी खेळ 5 ऑगस्टपासून सुरू करता येतील. प्रेक्षक व सामूहिक उपक्रम, सांघिक खेळ, एकापेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळण्याची शक्यता असलेले क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो – खो, हॉकी आदींना परवानगी असणार नाही. इनडोअर स्टेडियम किंवा स्टेडियमच्या आतील परिसरात कोणतेही उपक्रम, कार्यक्रम, खेळ यांना परवानगी नसेल.

शहरामध्ये रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता संचारबंदी सुरूच राहणार आहे. दुचाकीवर डबलसीट वाहतुकीस परवानगी दिली आहे. तीन चाकीमध्ये चालक आणि दोन व्यक्ती तर, चारचाकीमध्ये चालक आणि तीन व्यक्ती यांना परवानगी असेल. सलून, ब्युटी पार्लर आदींनाही अटी-शर्तीवर आधारित परवानगी आहे. दुकानांच्या वेळेत वाढ गर्दी होणाऱ्या प्रमुख बाजारपेठांतील दुकाने ही रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला या तत्त्वानुसार उघडी राहतील. त्या व्यतिरिक्त अन्य दुकाने मात्र दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) मात्र सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच एटीएम केंद्र, दूध, भाजीपाला, फळे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची विक्री सुरू राहील.

हे राहणार बंद ?

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवास विशेष परवानगी प्राप्त प्रवासाशिवाय देशातंर्गत विमान व रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक मेट्रो रेल प्रवास, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, रेस्टारंट व इतर आदरातिथ्य सेवा (वैद्यकिय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, विमानतळ, अलगीकरण केंद्र येथील उपहारगृह सुरू राहतील. सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, धार्मिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आदी. सर्व धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button