Uncategorized

पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावर बोलण्यासारखे बरेच, पण…; शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

मिशन- PCMC : मामुर्डी- किवळे- रावेत- गुरूद्वारा परिसरात शिवसेनेचा झंझावात

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, श्वान नसबंदी घोटाळे, लाच प्रकरणात स्थायी समिती सभापतीची अटक तसेच कोयता गँगचे सिनेस्टाइल हल्ले—अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्यासारखे असतानाही, “मी काहीही बोलत नाही,” असे सूचक विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भाजपच्या तत्कालीन सत्ताधारी स्थानिक नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी किवळे येथील मुकाई चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील चार सभांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यापूर्वी शिवसेना नेते उदय सामंत यांनी सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लाडक्या बहिणींनी मतपेटीत शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंना पहिला क्रमांक दिला, त्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. इतिहास टक्कर देणाऱ्यांचाच लिहिला जातो; तडजोड करणाऱ्यांचा नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका आणि बिनधास्त लढा. गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर सातत्याने टीका, शिव्याशाप सुरू आहेत. सत्याला त्रास होतो, पण सत्य कधीही पराभूत होत नाही. शिवसेना स्वबळावर लढत आहे; तिला कोणीही हलक्यात घेऊ नये.”

हेही वाचा –  प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचा ईव्हीएमवरील १२१२ पॅटर्न ; विरोधकांचा १२ वाजवणार

शिवसेना ‘किंगमेकर’ ठरणार

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भगव्या विचारांचे वादळ निर्माण झाले असून, शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. “ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांच्या विचारांशी कोणतीही तडजोड होणार नाही. एकदा शिवसेनेच्या हाती सत्ता द्या; विकासाचे कुलूप उघडून दाखवतो,” असे त्यांनी सांगितले.

सत्तेत आल्यानंतर शास्ती कर व दंड माफ करणे, बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देणे अशा निर्णयांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “मला काय मिळाले, यापेक्षा लोकांना काय दिले, हे महत्त्वाचे आहे. आम्ही शब्द देऊन थांबत नाही, तर तो पाळतो. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; पण तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला आहे. गेल्या तीन वर्षांत लाडक्या बहिणींसाठी ३६५ कोटी रुपये दिले असून, पुढेही निधी कमी पडू देणार नाही.”

विकासकामांची घोषणा

1. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पिंपरी चिंचवडसाठी पुढील विकासकामांची माहिती दिली—
2. तलाव व सरोवरांचे पुनरुज्जीवन
3. सांडपाणी निचऱ्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी
4. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५३ कोटींची योजना
5. पवना बंद जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करणे
6. पवना–मुळा–इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
7. समाविष्ट भागातील अर्धवट डीपी रस्ते पूर्ण करणे व चुकीचा डीपी दुरुस्त करणे
8. वाकड–हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविणे
9. आरोग्य केंद्रांची उभारणी
10. चापेकर स्मारकासाठी मंजूर ६८ कोटींपैकी १३ कोटींचा निधी वर्ग

या घोषणांसह शिवसेनेला संधी देण्याचे आवाहन करत शिंदे यांनी प्रचाराला धार दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button