प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचा प्रचार जोरात; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिशन-PCMC: तिरंगी लढतीत शिवसेनेचे पारडे जड?

पिंपरी–चिंचवड: चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा आणि वाल्हेकरवाडी परिसरात शिवसेनेचे प्रचार दौरे जोरात सुरू असून, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.
जुन्या व नव्या नेतृत्वाचा समतोल साधत शिवसेनेच्या पॅनलकडून राबविण्यात येणाऱ्या प्रचार मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहोचवली जात असून, या योजनेबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे महिलांकडून शिवसेनेला मिळणारा पाठिंबा अधिक भक्कम झाल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ (अ), ऐश्वर्या तरस (ब), सौ. रेश्मा बापूजी कातळे (क) आणि निलेश तरस (ड) यांनी सोसायटी-टू-सोसायटी तसेच घरभेटींच्या माध्यमातून धनुष्यबाण चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे सघन अभियान हाती घेतले आहे. किवळे परिसरात सौ. रेश्मा कातळे व बापूजी कातळे यांच्यावरील महिलांचा विश्वास प्रकर्षाने जाणवला. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – पिंपळे सौदागर येथे दुचाकीस्वार तरुणाच्या बॅगेत सापडली १५ लाखाची रोकड
प्रचारादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून ‘खीच केताण धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. नागरिक, महिला, युवक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेला भरघोस मतदान करू, अशी भूमिका अनेक मतदारांनी व्यक्त केल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत चुरशीची होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही भागांत समन्वय दिसून येत असला, तरी रावेत परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील समांतर लढतीमुळे सामना अधिक रंगतदार बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता सध्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे पारडे जड असल्याचे राजकीय समीकरण सूचित करत आहे.





