पुण्यात इतकी संवेदनशील मतदान केंद्र, आयुक्तांनी केली आकडेवारी जाहीर..!

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, त्यापैकी ९०६ मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संवेदनशील मतदान केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी ४,१०० पोलीस आणि २६ हजार कर्मचारी काम करणार आहेत.
‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. शहरातील ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, यासाठी ११५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठी १४,५०० मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), तर ५,५०० कंट्रोल युनिट असणार आहेत. निवडणुकीच्या देखरेखीसाठी विविध प्रकारची १७२ पथके स्थापन करण्यात आली आहेत,’ असे राम यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार, तुषार बाबर उपस्थित होते.
‘प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्र आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्र, अशी प्रत्येकी दोन केंद्रे असणार आहेत. निवडणुकीच्या प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ४५४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी १६ जानेवारीला होणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून टेबलसंख्या, फेरीसंख्या, कर्मचारी प्रशिक्षण याचे नियोजन केले जात आहे. निवडणुकीसाठी सुमारे १२ हजार टपाली मतपत्रिकांकरिता मागणी नोंदविली आहे,’ असे राम यांनी नमूद केले.
हेही वाचा – पिंपळे सौदागर येथे दुचाकीस्वार तरुणाच्या बॅगेत सापडली १५ लाखाची रोकड
महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १५ रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी एकाच ठिकाणी न होता वेगवेगळ्या १५ ठिकाणी होणार आहे. त्यासाठी शहरातील दोन क्षेत्रिय कार्यालयांसह विविध भागांतील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संकुल तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये मतमोजणी केंद्र असणार आहेत.
या मतमोजणी केंद्रांची सविस्तर माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी जाहीर केली. नगर रस्ता-वडगाव शेरी आणि धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी केवळ संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्येच होणार आहे. तर उर्वरित सर्व प्रभागांची मतमोजणी शहरातील विविध भागांमध्ये होणार आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. याची तयारी महापालिकेने केली आहे. ४१ प्रभागांपैकी ४० प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांनी मतमोजणी केंद्राची माहिती जाहीर केली.




