रहाटणी प्रभाग क्र.२७ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा: आमदार सुरेश धस यांचे मतदारांना आवाहन
मिशन- PCMC : चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे आणि अर्चना तापकीर यांच्या प्रचारार्थ सभा

पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्र. २७ रहाटणी, श्रीनगर व तापकीर नगर परिसरातील भाजपा–आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे आणि अर्चना तापकीर यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश अण्णा धस यांची जाहीर सभा आज रहाटणी येथे उत्साहात पार पडली.
सभेत बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, चंद्रकांत नखाते हे १९९० सालापासून राजकारणात सक्रिय असून त्यांचे संपूर्ण कुटुंब समाजकारण व राजकारणात कार्यरत आहे. या निवडणुकीत चित्र वेगळे दिसत असून स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपवर विश्वास दाखवला आहे. मोठ्या संख्येने नागरिक भाजपमध्ये प्रवेश करत असून शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजपकडेच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या घरांवर लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याच्या आंदोलनात चंद्रकांत नखाते यांचा मोठा पुढाकार होता. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे प्रभागात ४०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विकासकामांना गती मिळाली असल्याचेही धस यांनी सांगितले.
रहाटणी, काळेवाडी परिसराने बीड, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या नागरिकांना आपलेसे करून घेतले आहे. त्यांचा एका कुटुंब प्रमाणे नातं या परिसराशी झाले आहे. त्यामुळे नक्कीच हे सर्व बांधव भाजपच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – ओम शिवशक्ती मित्र मंडळातील मतदारांचा आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांना चांगले दिवस आले असून अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत, असे त्यांनी नमूद केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका करताना धस म्हणाले की, शहरात त्यांना उमेदवारही देता आले नाहीत. अडीच वर्षांच्या काळात त्यांनी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले. कोरोना काळात जे कार्यकर्ते सक्रिय होते, तेच या निवडणुकीत विजयी होतील. उबाठा नेते केवळ फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्त होते, तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असतानाही संपूर्ण राज्यात फिरून रुग्णालयांची पाहणी करत होते. कोरोना काळात उबाठा सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना हक्काची पक्की घरे मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांचे काम करणारे नेतृत्व असल्याचे धस यांनी अधोरेखित केले. प्रभागातील चारही उमेदवार अनुभवी असून विरोधकांकडे संघटन व प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.





