Uncategorized

नरेंद्र मोदींसोबत एकनाथ शिंदेंची बैठक!

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नवी दिल्ली : दर अधिवेशनात खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीला येतो. आमच्या खासदारांना भेटलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. कोण टीका करत आहे, कोण काय बोलत आहे, यापेक्षा मला काय करायचे ते करत असतो. विरोधक नेहमी टीका करण्याचे काम करत असतात. टीकेला कामाने उत्तर देत असतो, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा : ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार; 

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे दीड-दोन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. किरेन रिजिजू यांनी श्रीकांत शिंदेंचे कौतुक केले. श्रीकांत शिंदे यांचेही सगळ्यांशी चांगले राजकीय संबंध आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

इराण इस्रायल युद्धाबाबत चर्चा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इराण इस्रायल युद्धाबाबत चर्चा केली. देशातील सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये जे भारतीय अडकले होते, त्यांना आणण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदींना सांगितले की, अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणने होर्मुझमधून दोन जहाजे आली आहेत. यावरही चर्चा झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे

विरोधी पक्ष, सत्ताधारी या सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे. दुर्दैवाने युद्धजन्य परिस्थितीत विरोधक राजकारण करत आहेत. राजकारण करता कामा नये. गॅस, इंधन तुटवडा आहे असे सांगतात, त्यामुळे साठेबाजांना संधी मिळते, हे ते लक्षात घेत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी विरोधक असेच वागले. पाकिस्तानात हेडलाइन व्हाव्यात म्हणून काही लोक बोलतात, हे काही योग्य नाही. इंधनाचा बेकायदेशीर स्टॉक कुणीही करू नये. सिलिंडरचा तुटवडा भासू देणार नाही हे केंद्राने स्पष्ट केले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर एकनाथ शिंदेंना फोन करा. एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, असे विधान केले होते. यावर पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असे पत्रकारांनी विचारताच, राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button