उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द ; तिरंगी लढतीतून शिवसेना बॅकफूटवर?
मिशन- PCMC: भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना चर्चेत

रावेत : प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारी बातमी काल घडली. मुकाई चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षित गर्दी न झाल्याने सभा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ९ जानेवारी रोजी किवळे परिसरात शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांनी सभेकडे पाठ फिरवली. यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणांवर थेट परिणाम झाल्याचे मानले जात आहे.
सुरुवातीला या प्रभागात शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिरंगी लढतीची चिन्हे दिसत होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेलाच नागरिकांनी मर्यादित प्रतिसाद दिल्याने शिवसेनेची गती मंदावल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक १६ मधील मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – चिखली प्रभाग १: स्व. दत्ता काका साने यांच्या वारशाला पुढे नेणारा “श्रावण बाळ” विकास साने
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये त्याच्याविषयी नाराजी असल्याचे चित्र देखील समोर येत आहे. याचा फायदा भाजपच्या विकासाभिमुख नेतृत्वाला मिळून भाजपकडे मतदार झुकतील, अशीही राजकीय चर्चे सुरू झाली आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा प्रभाग १६ मधील भाजप उमेदवारांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे शिवसेना बॅकफूटवर गेल्याची चर्चा, दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील थेट सामना आणि वैतागलेल्या नागरिकांचा भाजपला समर्थन अशा अनेक चर्चा सध्या प्रभागात रंगत आहेत. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणूक लढत आणखी चुरशीची होणार यात शंका नाही. आगामी काही दिवसांत सर्व पक्षांचे अंतिम रणनीती कशी राहील यावर निकालाचे गणित दिसून येणार आहे.




