नागपूर शहरात दोन वर्षानंतर नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

नागपूर | शहरातील विविध भागात सार्वजनिक देवी उत्सव मंडळात सोमवारी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर अनेक घरांमध्ये घट, कलश आणि छोट्या मूर्तीही विराजमान केल्या जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात करोनामुळे गरबा-दांडिया महोत्सवावर निर्बंध होते. यावेळी मात्र शहरातील विविध भागात गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून घरोघरी व सार्वजनिक मंडळात देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असल्यामुळे अनेक मंडळांनी सकाळपासून चितार ओळीतून ढोलताशांच्या निनादात दुर्गामातेची मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती.
नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे शहरातील कोराडीतील महालक्ष्मी मंदिरासह, आग्याराम देवी, पारडीतील भवानी देवी मंदिरात, अयाचित मंदिर यासह विविध भागातील देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. देवी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नऊ दिवस अखंड दीप, दुर्गा सप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रतापनगर येथील दुर्गा मंदिरात, अयाचित मंदिरजवळी नवचंदी देऊळ, नंदनवन भागातील आदिशक्ती देवीचे मंदिर, सेंट्रल अॅव्हेन्यू येथील रेणुका माता व बडकस चौकातील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव सुरू होणार आहे.
शहरातील अतिशय प्राचीन असे अयाचित मंदिरातही नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विधिवत बालाजी आणि नवचंडिका देवीची पूजा केली जाणार आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. शहरातील विविध भागात विविध दुर्गादेवी उत्सव साजरा केला जात असून आकर्षक मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहे. उद्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
यंदा कुठलेच निर्बंध नसल्यामुळे रायसोनी, संकल्प या संस्थेच्यावतीने गरबा दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवाय वर्धमाननगर, क्वेटा कॉलनी, सदर, पाचपावली, पांडव कॉलेजसह शहरातील विविध भागात गरबा दांडिया महोेत्सव आयोजित करण्यात आला आहे. या गरबा दांडिया महोेत्सवाच्या निमित्ताने महिला व पुरुषांनी पारंपरिक पोशाख खरेदी केले आहे तर काही ठिकाणी ते भाड्याने दिले जात आहेत.