TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

५० कोटींच्या हेरॉईनसह दोन परदेशी नागरिकांना अटक

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर कारवाई करून सुमारे आठ किलो हेरॉईन जप्त केले. याप्रकरणी एका महिलेसह दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत ५० कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

रोनाल्ड न्याशादझायशे माकुम्बे (५६) व माकुम्बे लवनेस (५२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही झिम्बाब्वे देशाच्या पारपत्रावर प्रवास करत होते. आरोपी अमली पदार्थासह प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डीआरआयचे अधिकारी विमानतळावर पोहोचले. आरोपी अदिस अबाबा येथून मुंबई विमानतळावर आले असता मोठय़ा शिताफीने त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडील बॅगेत ३८४५ ग्रॅम व ३९८० ग्रॅम हेरॉईन सापडले. दोघांकडून सात किलो ९२५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ५० कोटी रुपये आहे. त्यांना केपटाऊन येथे अमली पदार्थ देण्यात आले होते. तेथून ते भारतात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यासाठी त्यांना पाचशे अमेरिकन डॉलर्सही देण्यात आले होते. आरोपींच्या चौकशीत मुख्य आरोपीची माहिती मिळाली असून त्यानेच केपटाऊन येथे दोघांकडे अमली पदार्थ सुपूर्द केले होते. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली.

आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले असून डीआरआयचे अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button