breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, रामदास आठवलेंचा दावा

नाशिक: अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, असा अजब दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. “ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र सगळे बौद्ध होते. त्यानंतर या देशात हिंदू धर्म आला, नंतर हिंदू लोक झाले. इथले मुसलमान काही बाहेरून आलेले नाहीत. ते आधी हिंदू होते, हिंदूपूर्वी ते बौद्ध होते”, असा दावा रामदास आठवले यांनी केलाय.

  • राज ठाकरेंची भूमिका मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ला छेद देणारी – रामदास आठवले

वाद लावण्याचा प्रयत्न हा काही लोकांचा आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होणे हे देशासाठी फार मोठं नुकसान आहे. नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ अशी भूमिका मांडत आहे आणि त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भोंगे वादावरून टीका केलीये.

  • राज ठाकरेंची गुंडागर्दी योग्य नाही – रामदास आठवले

‘राज ठाकरेंनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवरचे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, ही गुंडागर्दी योग्य नाही. माझा पक्ष हा बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करणारा आहे. त्यांची भूमिका असंवैधानिक पद्धतीची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली नाही. राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल घातली आहे, तर चांगली गोष्ट आहे. कारण, भगवा हे शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंग हा भगवाच होता. भगवा रंग हा वाद लावण्याचा प्रतीक अजिबात नाही’, असंही ते म्हणाले.

‘महाराष्ट्रातील प्रश्नांकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे. ठाकरे सरकार हे वादविवादामध्ये पूर्णपणे अडकले आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचे, रस्त्यांचे, बेरोजगरीचे, दलीत आदिवासींवर होणारे अत्याचाराचा प्रश्न, बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची थकबाकी मिळत नाही, असे अनेक प्रश्न आहे. या प्रश्नांसाठी सरकारने काम करणे आवश्यक आहे. मात्र, मूळ प्रश्न सोडून उत्तरे देण्यात संजय राऊत यांचा वेळ व्यर्थ होत आहे’, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी, कल्याणासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे, ते निर्णय सरकार कडून होत नाही. त्यामुळे हे सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने पुढे चालले आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

  • राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा, हे अत्यंत अन्यायकारक – रामदास आठवले

‘उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी राणा दाम्पत्य हे दिल्लीतून हनुमान चालीसा पठण करणार असेल, तर त्यांची भूमिका ही चुकीची नाही असे मला वाटते. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणं ही बाब अत्यंत अन्यायकारक होती. त्यांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती, त्यांनी अडवलंही, ते घरातून बाहेरही पडले नाहीत, असं असताना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणं, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अन्याय करणं ही मुंबई पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची होती. राजकीय हेतूने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. कालच दिल्ली येथे राणा दाम्पत्यांची भेट घेऊन रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी असून आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ, असं ते म्हणाले.

  • खंजीर खुपसणाऱ्या पक्षाबरोबर राहणं अत्यंत अयोग्य, आठवलेंचा पटोलेंना सल्ला

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षांपासून पटत नाही. कारण, पवार साहेब हे काँग्रेसमधून बाहेर पडले, मद त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवली. त्यावेळेपासून दोघांत अजिबात जमत नाही. पण सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले आणि शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत मश्गूल झालेले आहेत. जर आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे, तर आपण त्या सरकारमध्ये का राहताय? माझं नाना पटोलेना आवाहन आहे की सरकारमधून काँग्रेस पक्षाने बाहेर पडावं, अशा खंजीर खुपसणाऱ्या पक्षाबरोबर राहणं अत्यंत अयोग्य आहे’, असा सल्ला आठवलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button