दहशत निर्माण करण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार करून दात पाडले
पिंपरी l प्रतिनिधी
दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. दुस-या तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर लोखंडी फायटरने तोंडावर मारून दात पाडले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेबारा वाजता पिंपळे गुरव येथे घडली.
रोहित डनिअल तोरणे (वय 22, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सावंत (रा. दापोडी), प्रमोद भोसले, जोसेफ, तेजस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपी दुचाकीवरून तिथे आले. आरोपींनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचा मित्र निलेश पत्री याला कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी घाबरून पळून जात असताना आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर, खांद्यावर कोयत्याने मारून त्यांच्यावर देखील खुनी हल्ला केला. त्यानंतर आरोपी जोसेफ आणि तेजस यांनी लोखंडी फायटरने मारून फिर्यादी यांचा दात पाडला. पाठीवर, गालावर, पोटावर मारहाण केली. आरोपी प्रमोद याने सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.