पिंपरी / चिंचवड

चिंचवड, मोशी आणि भोसरीत एकाच दिवशी तीन आत्महत्या

पिंपरी l प्रतिनिधी

शहराच्या चिंचवड, मोशी आणि भोसरी परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

आत्महत्येची पहिली घटना चिंचवड येथे घडली. मुकूंद हिराचंद घाडगे (वय 37, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. घाडगे यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. त्यातील अडीच लाखांचे कर्ज थकले होते. तसेच त्यांचा मालमत्तेवरून भावासोबत वाद सुरू होता. यातून आलेल्या नैराश्‍यातून मुकूंद घाडगे यांनी रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना मोशी येथे घडली. बशीर मेहबुब सय्यद (वय 70, रा. राधाकृष्ण कॉलनी, मोशी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. 15 वर्षापूर्वी त्यांना लकव्याचा आजार झाला होता. या आजारपणाला कंटाळून त्यांनी रविवारी रात्री आठ वाजताच्या समुारास राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

आत्महत्येची तिसरी घटना भोसरी येथे घडली. योगेश मधुकरराव घंगाळे (वय 45, रा. मोहननगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. योगेश यांना दारूचे व्यसन होते. तर त्यांच्या पत्नी धुण्याभांड्याची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यामध्ये जाऊन लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button