breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

यंदा आषाढी पालखी सोहळा होणारच, वारकऱ्यांची ठाम भूमिका

पंढरपूर – आषाढी एकादशी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा कोरोनाची परिस्थिती गेल्यावर्षी पेक्षाही अधिक बिकट झाल्याने यंदाही वारी होणार की नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात जाणार की पायी वारी करायला मिळणार याकडे राज्यातील वारकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच, यंदा कोणत्याही परिस्थितीत आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल, अशी ठाम भूमिका वारकरी आणि महाराज मंडळींनी घेतली आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शुक्रवारी यासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत पालखी सोहळ्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आणि मानाच्या सात संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणण्यात आल्या. त्यानंतर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी सोहळा पार पडला. यावर्षी कोरोनाचं सावट दूर होऊन आषाढी पालखी सोहळा मोठ्या थाटामाठात निघेल अशी वारकऱ्यांना आशा होती. मात्र जानेवारीपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय.

दरम्यान, आषाढी पायी पालखी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. यावर्षी 1 जुलै रोजी संत तुकाराम आणि 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जनजीवन ठप्प आहे. त्यामुळे यंदाही आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. अशातच वारकरी आणि महाराज मंडळींनी यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे पायी पालखी सोहळ्यावरुन वारकरी विरुध्द सरकार असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘वारकऱ्यांचं लसीकरण करावं’
आषाढी पायी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. कोरोनाचे सर्वनियम पाळून पायी पालखी सोहळ्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. गतवर्षी वारकर्यांनी राज्य शासनाला सहकार्य केले होते. यावर्षी राज्य शासनाने वारकऱ्यांना सहकार्य करावे. मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने वारकऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावं. तसंच आषाढी यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीला प्रमुख महाराज मंडळी आणि विविध वारकरी संघटनांच्या लोकांना बोलवावं अशी मागणी भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button