breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह केला होता, फडणवीसांचा गौप्यस्फोट

पुणे – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी राज्याचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच, त्यांचे शिवसेना कनेक्शन असल्याने या प्रकरणात राज्य सरकारलाही धारेवर धरण्यात येत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, राज्य अस्थिर करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा दावा हास्यास्पद असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीसांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले. ‘सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी मी वाझेंची फाईल अॅडव्होकेट जनरलना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मला वाझेंना सेवेत न घेण्याचा तोंडी सल्ला दिला होता. वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केलं आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेता येणार नाही. तो कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असं मला अॅव्होकेट जनरलनी सांगितलं होतं. त्यामुळे मी वाझेंना सेवेत घेतलं नव्हतं“ असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर कोरोनाचं संकट आल्याने त्याचं कारण दाखवून काही रिटायर अधिकारी सेवेत हवेत असं कारण दाखवून ठाकरे सरकारने वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं. आश्चर्य म्हणजे क्राईम इंटेलिजन्स युनिट हे अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याचा प्रमुख हा पीआयचं असतो. असं असताना केवळ वाझेंसाठी पीआयची बदली करून एपीआय असलेल्या वाझेंना या विभागाचं प्रमुखपद दिलं. 16 वर्षे सेवेतून निलंबित असलेल्या वाझेंना ठाकरे सरकारने हे पद दिलं. त्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य केसेस त्यांच्याकडे देण्यात आल्या. वाझे शिवसेनेत होते. शिवसेनेचे प्रवक्तेही होते. त्यामुळे त्यांना केसेस दिल्यात का हे मला माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रकरण वाझेंपुरते मर्यादित नाही

आम्ही या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला. पण सरकार वाझेंना पाठिशी घालण्याचं काम करत होते. वाझे काय लादेन आहेत का? असा सवाल करत वाझेंची वकिली सुरू होती. आता एनआयएने तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणातून सर्व बाहेर येईल. आता एनआयएने मनसुख हिरेनप्रकरणाचाही तपास सुरू करावा, त्यातून बरेच धागेदोरे बाहेर येतील. हे प्रकरण केवळ वाझेंपुरतंच मर्यादित नाही. त्यात कुणाचा पाठिंबा आहे आणि कुणी रोल प्ले केलाय हे सर्व बाहेर यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

म्हणून एनआयए आली

अंबानी यांच्या घराच्या बाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्याने एनआयएला यावं लागलं. यातला घटनाक्रम तुम्ही पाहा. धमकी देणं वगैरे याबाबीही यात आहेत. आज जे अधिकारी अटकेत आहेत, तेच या प्रकरणाचे तपास अधिकारी होते, हे सर्वात गंभीर आहे. त्यामुळे एवढे पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांवर अविश्वास आहे, महाराष्ट्रद्रोह आहे, असं बोलणाऱ्यांनी वाझेंमुळे महाराष्ट्राची इमेज चांगली होते का? याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी राऊत यांना नाव न घेता लगावला.

आधी त्यांना जाब विचारा

हे काही छोटं प्रकरण नाही. याचा योग्य तपास झाल्यास फार मोठ्या गोष्टी बाहेर येतील, असं सांगतानाच आम्ही राज्य अस्थिर करतोय असा आरोप केला जातोय. हा दूधखुळा आणि हस्यास्पद आरोप आहे. राज्य कोण खिळखिळं करतंय, आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना कोणी महत्त्वाचे पद दिलं त्याचा जाब आधी विचारला पाहिजे, असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button