breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“आमच्याशी भारत सरकारचा संपर्क झाला ही अफवा”; युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानं सांगितली सत्य परिस्थिती

नवी दिल्ली |

युक्रेनमधील खार्कीव्ह शहरामध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांचा आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नसल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी आमचा संपर्क झाल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा अफवा असल्याचं युक्रेनमधील विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना युक्रेनमधील दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने तेथील सत्य परिस्थिती सांगितलीय. खार्कीव्हमधील बंकरमध्ये अडकून पडलेल्यांपैकी श्रीधरन गोपालकृष्णन् या विद्यार्थ्याने इंडियन एक्सप्रेशशी बोलताना आमच्याशी आतापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही असं म्हटलंय. मूळ चेन्नईचा असणाऱ्या श्रीधरनने आम्ही सर्वजण आता हॉस्टेलमधील बंकरमध्ये लपलो आहोत असं सांगितलंय. मात्र आम्हाला येथून कसं बाहेर काढण्यात येणार हे अद्याप आम्हाला ठाऊक नसल्याचंही त्याने म्हटलंय. “त्या केवळ अफवा आहे, भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाहीय,” असं श्रीधरनने स्पष्ट शब्दा सांगितलंय.

श्रीधरनने त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं आहे. मरण पावलेल्या मुलाचं नाव नवीन शेखरप्पा गायनागोदर असं असून तो वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. “नवीनला युक्रेनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तो किराणा मालाच्या दुकानासमोर उभा होता. तेव्हा रशियन लष्कराने लोकांवर गोळीबार सुरु केला. त्याच्या मृतदेहाबद्दल आम्हाला काहीही माहिती नाहीय. आमच्यापैकी कोणालाही रुग्णालयामध्ये जाता आलं नाही. कदाचित त्याचा मृतदेह तिथे ठेवला असेल,” असं श्रीधरनने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय.

परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

  • किव्ह आणि खार्कीव्हमध्ये संघर्ष…

किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु आहे. असाच एक हल्ला आज म्हणजेच युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर केलाय. शहरामधील मुख्यचौकात क्षेपणास्त्राने मारा करण्यात आल्याचा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button