Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतून जातो! आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदेंचा वरळीतून प्रवास

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज अखेर १० दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावरून बाहेर पडताच एकनाथ शिंदे हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ‘सागर’ या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. सत्ता स्थापनेच्या दृष्टीने फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर हे दोन्ही नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जातील, अशी माहिती आहे.

शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आक्रमक झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या आमदारांना आक्रमक आव्हान दिलं होतं. जेव्हा तुम्ही मुंबईत विमानतळावर उतराल तेव्हा माझ्याच वरळी मतदारसंघातील रस्त्यांवरून बाहेर पडाल, असा इशारा आदित्य यांनी दिला होता. मात्र काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मला मुंबईतील रस्त्यांवर शिवसैनिकांचं रक्त बघायचं नाही, त्यामुळे तुम्ही या बंडखोर आमदारांच्या वाटेत येऊ नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुंबईत आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला नाही.

आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असून या भेटीत ते सत्ता स्थापनेचा दावा करतील, अशी माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतांच्या आधारे बहुमत सिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि इतर १० अपक्ष आमदार आहेत. गोव्यात आज सकाळी शिंदे गटाची बैठक झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आणि सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button