breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

टाटा रुग्णालयात प्लेटलेट्सदात्यांच्या संख्येत वाढ

जनजागृतीमुळे एकूण आवश्यकतेच्या ८७ टक्के प्लेटलेट्स प्राप्त

परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात कर्करोग रुग्णांना प्लेटलेट्स उपलब्ध होण्यासाठी राबविलेल्या ‘सेव्ह अ लाइफ’ मोहिमेला यश आले आहे. दात्यांचे प्रमाण वाढत असून ८७ टक्के प्लेटलेट्स दात्यांकडून प्राप्त होत आहेत. आठ वर्षांपूर्वी हे प्रमाण केवळ ११ टक्के होते.

प्लेटलेट्सच्या जनजागृतीसाठी ‘सेव्ह अ लाइफ’ हे मोबाइल अ‍ॅप आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी तयार केलेल्या लघुपटाचे अनावर मंगळवारी टाटा मेमोरिअल रुग्णालयात झाले. या वेळी नियमितपणे प्लेटलेट्स दान करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. टाटा रुग्णालयाची गरज पाहता प्लेटलेट्स दानाबाबत जनजागृती करण्यासाठी २००९ साली ‘सेव्ह अ लाइफ’ ही मोहीम हाती घेतली तेव्हा २२८ पिशव्या दात्यांकडून जमा झाल्या होत्या. रुग्णालयाच्या एकूण आवश्यकतेपैकी ११ टक्के प्लेटलेट्स दात्यांकडून प्राप्त होत होत्या. २०१८ मध्ये एकूण आवश्यकतेच्या ८७ टक्के (३३४९ पिशव्या) प्लेटलेट्स दात्यांमार्फत प्राप्त होत आहेत. त्यामुळे ही मोहीम अजून पुढे जाऊन १०० टक्क्यांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण औषध विभागाचे प्रमुख डॉ. सुनील राज्याध्यक्ष यांनी व्यक्त केली. टाटा रुग्णालयात देशभरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यांना दाते मिळविणे अवघड असल्याचे इम्पॅक्ट फाऊंडेशनच्या शालिनी जाटिया यांनी सांगितले. केवळ माहितीच्या अभावामुळे दाते पुढे येत नाहीत. त्यामुळे महाविद्यालये व कंपन्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. आता २५ कंपन्यांतील दाते नियमितपणे प्लेटलेट्स दान करू लागले आहेत, असे रुग्णालयाच्या बालरुग्ण (कर्करोग) विभागाचे प्राध्यापक डॉ. तुषार व्होरा यांनी सांगितले. सेव्ह अ लाइफ अ‍ॅपमध्ये प्लेटलेट्स दानाची अधिक माहिती उपलब्ध असून यामध्ये थेट वेळ घेऊन दान करण्यासाठी येण्याची सुविधा उपलब्ध आहे.

‘मी ५१ वर्षांचा आहे. २४० वेळा दान केले आहे,’ असे बोरीवलीचे संजय बापट यांनी सांगितले. १८व्या वर्षांपासून प्लेटलेट्स दान करणारा रोहन निकम (२३) सांगतो, ‘दर २८ दिवसांनी मी प्लेटलेट्स देण्यासाठी इथे येतो. ७० वेळा दान केले आहे.’

रक्तदानासारखीच प्रक्रिया

* प्लेटलेट्स दान केल्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा दान करणे शक्य आहे. प्लेटलेट्स दानसाठी ५५ वर्षांची मुदत आहे.

* प्लेटलेट्स दान करण्यापूर्वी काही चाचण्या केल्या जातात.

* प्लेटलेट्सच्या एका पिशवीची कालमर्यादा पाच दिवस असते.

* सर्वसाधारणपणे रक्ताच्या सहा ते आठ बाटल्यांमधून विगलीकरण केल्यानंतर एक पिशवी प्लेटलेट्स जमा होतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button