breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात जनता वसाहतील कॅनॉलमध्ये रिक्षा कोसळली, रिक्षाचालकही गेला वाहून

पुणे | प्रतिनिधी 

पुण्यातील जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये एका रिक्षा कोसळून रिक्षाचालक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने रिक्षाचालक यात वाहून गेल्याचं समजतं आहे. सध्या अग्निशामक विभागाच्या कर्मचार्‍याकडून रिक्षाचालकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (30 जानेवारी) संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे एका रिक्षा चालक प्रवाशाला सोडण्यास आला होता. तेथून त्याला वारजेकडे जायचे होते.

मात्र, रिक्षाचालकाला वारजेकडे जाण्याचा नेमका रस्ता माहित नसल्याने त्याने रस्त्याच्या कडेलाच उभ्या असलेल्या मुलांना वारजेकडे जाण्याचा रस्ता विचारला. यावेळी मुलांनी देखील त्याला नेमका रस्ता सांगितलं. त्यामुळे रिक्षाचालक आपली रिक्षा वळवून त्या दिशेने जाऊ लागला. पण रस्ता कच्चा असल्याने काही अंतरावर जाताच रिक्षा थेट कॅनॉलमध्ये कोसळली. अवघ्या काही क्षणांमध्ये ही घटना घडली. त्यामुळे नेमकं झालं हे देखील सुरुवातीला कळलं नाही.

मात्र, ही घटना तेथील मुलांनी पाहिली त्यामुळे त्यापैकी चार ते पाच मुलांनी रिक्षाचालकाला वाचविण्यासाठी थेट कॅनॉलच्या प्रवाहात उड्या मारल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने मुलांना रिक्षाचालक सापडला नाही. प्रवाह जास्त असल्याने रिक्षाचालक वेगाने वाहून गेला.

दरम्यान, स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला कळवली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रिक्षा कॅनॉलमधून बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, रिक्षाचालक सापडू शकला नाही.

सध्या अग्निशमन दलाचे जवान कॅनॉलच्या प्रवाहात उतरुन रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. मात्र, अंधार असल्याने शोधकार्यात अडचणी येत असल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांनाकडून करण्यात येत आहे. जेणेकरुन अशा स्वरुपाचे आणखी अपघात होऊ नयेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button