ताज्या घडामोडीमुंबई

मुलाने वडिलांना कानाखाली मारत १० वेळा चाकूने छातीवर केले वार; हायकोर्ट म्हणाले, “इतकंही गंभीर नव्हतं…”

मुंबई  | मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्याच वडिलांच्या हत्येसाठी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुलाची याचिका फेटाळली आहे. वडील मुलाला फक्त ओरडले होते. हे इतकंही गंभीर नाही ज्यासाठी आरोपीने आपल्याच वडिलांची हत्या केली असं हायकोर्टाने यावेळी म्हटलं. हायकोर्टात २८ वर्षीय नेताजीकडून दाखल याचिकेवर सुनावणी सुरु होती.

नेताजी कोल्हापूर आणि शिर्डीमध्ये पुजारी म्हणून काम करत होता. २ डिसेंबर २०१३ ला तो उस्मानाबादमधील आपल्या तेर गावात आला होता. रात्री जवळपास ९ वाजता नेताजी जेवण्यासाठी आला. जेवल्यानंतर घरातून जात असताना त्याचे वडिल नानासाहेब यांनी बेरोजगार आहेस, त्यामुळे पुन्हा घरी येऊ नको असं सांगितलं. यावर नेताजीने वडिलांना कानाखाली लगावली असा आरोप असून यानंतर चाकूने छाती आणि पोटावर वार केले. यादरम्यान गोंधळ ऐकून नेताजीची आई आणि बहिणी बाहेर धावत आल्या. यानंतर तो फरार झाला.

नानासाहेब यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जेव्हा नेताजीला पकडण्यात आलं तेव्हा रक्ताने माखलेले त्याचे कपडे आणि चाकू ताब्यात घेण्यात आला. एका मंदिरामागे तो लपून बसला होता. एक वर्ष सुरु असलेल्या सुनावणीनंतर उस्मानाबाद सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नेताजीने वकिलाला दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीपासून आपल्यासहित तीन मुलं आहेत. आम्हा तिघांना वडिलांनी काहीच दिलं नाही. पण दुसऱ्या पत्नीपासून असणाऱ्या दोन मुलांच्या नाव सर्व शेती करण्यात आली. नेताजीने सांगितल्यानुसार, आपण घरी गेल्यानंतर संपत्तीमध्ये भागीदारी मागत होता ज्यासाठी वडील आणि दुसऱ्या पत्नीची मुलं नकार देत होते.

नेताजीने हत्या झाली तेव्हा गावात लोडशेडिंग असल्याने अंधार होता असं सांगितलं असून बहिणींनी काही पाहिलं नसल्याचा दावा केला आहे. तसंच इतर साक्षीदारांबद्दल बोलतानाही त्याने शंकेचा फायदा दिला जावा अशी मागणी केली होती. ही हत्या नियोजित नसून संतापाच्या भरात करण्यात आल्याचा युक्तिवादही त्याच्याकडून करण्यात आला होता.

हायकोर्टाने मात्र नेताजीचा युक्तिवाद मानण्यास नकार दिला. हत्या करण्याच्या हेतूनेच ही घटना घडल्याचं कोर्टाने म्हटलं. हायकोर्टाने सांगितलं की, “नेताजीने वडिलांच्या गालावर फक्त कानाखाली मारली नाही, तर वडिलांनी जेव्हा याचा जाब मागितला तेव्हा त्याने हत्यार काढत वडिलांवर १० हून अधिक वार केले. मृत व्यक्तीच्या शरिरावरील जखमा पाहून आम्हीदेखील आश्चर्यचकित आहोत”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button