breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधा-यांचा आश्वासनांचा फुगा फुटला, एकाही नागरिकाला मदत मिळाली नाही – माजी आमदार विलास लांडे

  • 15 लाख लसीचे डोस खरेदीची वल्गना विरली हवेत
  • कष्टक-यांना 3 हजार रुपये देण्याची योजना ठरली ‘फेल’
  • प्लाझ्मा दान करणा-याला तीन हजार रुपये देण्याचे झाले ‘हासू’

पिंपरी / महाईन्यूज

सत्तेत आल्यानंतर शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील सध्याचे सत्ताधारी केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये देणार, 15 लाख लसीचे डोस खरेदी करणार, प्लाझ्मा दान करणा-यांना प्रत्येकी 3 हजार रुपये अर्थसहाय देणार अशा ढिगभर घोषणांचा सत्ताधा-यांनी पाऊस पाडला. मात्र, शहरातील एकाही नागरिकाला यातील एकाही योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही. ही बाष्फळ आश्वासने देऊन सत्ताधा-यांनी जनतेची घोर फसवणूक केली आहे, असा सणसणीत टोला माजी आमदार विलास लांडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांना लगावला आहे.

माजी आमदार लांडे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांनी एचए कंपनीला लस उत्पादन करण्यासाठी 25 कोटी देण्याची घोषणा केली. सध्या कंपनीला लस निर्मितीसाठी केंद्रातील मोदी सरकारने परवानगीच दिलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची 25 कोटींची घोषणा हवेतच विरणार असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांना 3 हजार रुपये मदत देण्याचा गाजावाजा केला. मात्र, अद्याप एकाही लाभार्थ्याच्या हातावर एक दमडीही ठेवली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधा-यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर आहे. कोविडच्या लसींचा साठा अपुरा पडत आहे. 15 लाख लसीचे डोस खरेदी करण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली. मात्र, अद्याप लस खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांना पहिला डोस मिळत नाही. तर, काहींना दुस-या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी वस्तुस्थिती लांडे यांनी मांडले आहे.

प्लाझ्मा दान केल्यानंतर 3 हजार रुपये देऊ अशी आश्वासनाची खैरात देखील सत्ताधाऱ्यांनी केली आहे. सध्या प्लाझ्मा वापरू नये असे तज्ञ सांगत आहेत. उपचाराच्या या थेरपीला केंद्र सरकारने कोविड उपचार प्रक्रियेतून वगळले आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करणा-यांना 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन आता गंगेला वाहले आहे. सत्ताधा-यांच्या अशा बोगस आश्वासनांमुळे पिंपरी-चिंचवडकरांची घोर फसवणूक होत आहे. तसेच, कोविडच्या नियोजनात देखील सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचे चित्र आहे. नियोजनात विस्कळीतपणा आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता कष्टकऱ्यांना, शहरवासीयांना तात्काळ योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अन्यथा जनतेची फसवणूक केल्यास जनताच सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा सणसणीत टोला देखील माजी लांडे यांनी लगावला आहे.

कष्टक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर – लांडे

उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर आठवड्यातून एकदा पुण्यात प्रशासकीय बैठक घेत आहेत. लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना 1500 रुपयांचे अनुदान मिळाले. भविष्यातही शहरातील रखडलेले प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पार्थदादा पवार युवा मंचच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरातील कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असा विश्वास देखील लांडे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button