TOP Newsताज्या घडामोडीपुणे

टोमॅटोला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव

पुणे : टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने भावात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टोमॅटोचे भाव ६० ते ८० रुपयांवरून घासरून १० ते २५ रुपयांपर्यंत आहेत. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवड खर्च, वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

नवीन टोमॅटोची आवक राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात सुरू झाली आहे. राज्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड नाशिक, पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर परिसरात टोमॅटोची लागवड केली जाते. गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोची आवक वाढली असून वाशीतील नवी मुंबई बाजार समिती तसेच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात दररोज साधारणपणे सहा ते पंधरा हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक होत आहे. रविवारी टोमॅटोची आवक दुपटीने वाढते.

गेल्या दोन आठवड्यांपासून घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार ६० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. टोमॅटोची आवक बेसुमार होत असून टोमॅटोला फारशी मागणी नसल्याने दरात मोठी घट झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील अडते विलास भुजबळ यांनी दिली.पावसाळ्यात टोमॅटोची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने टोमॅटोच्या भावात वाढ झाली होती. टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घट झाली असल्याचे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

हॉटेल चालकांकडूनही मागणीत घट

फारशी मागणी नसल्याने टोमॅटोच्या भावात घट झाली आहे. चांगल्या प्रतीच्या टोमॅटोच्या भाव २० ते २५ रुपये किलो आहेत. आकाराने लहान असलेल्या टोमॅटोचे भाव १० ते १२ रुपये किलो आहेत. जुलै महिन्यात टोमॅटोची आवक कमी प्रमाणावर होत होती. त्या वेळी एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये असा भाव मिळाला होता. हाॅटेल चालकांकडून टोमॅटोला मागणी नसल्याने भावात घट झाली आहे.

– प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते

फेकण्यापेक्षा मिळेल त्या भावात विक्री

टोमॅटो वाहतूक खर्च, लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीच्या आवारात साधारणपणे एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. टोमॅटो फेकून देण्यापेक्षा बाजार समितीच्या आवारात मिळेल त्या भावात टोमॅटोची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लागवड खर्च, मजुरी, भराई, वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button