breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला

मुंबई |

लग्नाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वेतून पळवून नेण्याचा कट रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. रेल्वेगाडीमधील शौचालयात लपवून ठेवलेल्या या मुलीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी बाहेर काढले. मात्र या कारवाईदरम्यान तिचा तथाकथित प्रियकर नातेवाईकांसह फरारी झाला आहे. ताब्यात घेतलेल्या मुलीला सध्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या मुलीला एर्नाकुलम एक्सप्रेस या रेल्वेगाडीतून पळवून नेले जात असल्याची माहिती केरळ पोलिसांनी कोकण रेल्वेच्या मडगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाला दिली. त्यामुळे ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी रेल्वे पोलीस व ग्रामीण पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून या पथकाचे तीन भाग केले आणि गेल्या सोमवारी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर कसून तपासणी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रेल्वेगाडीचे सर्व डबे तपासले. मात्र संशयित मुलगी सापडली नाही.

अखेर पोलिसांनी डी-१ या डब्यामध्ये पुन्हा प्रवेश करून त्या मुलीचा फोटो प्रवाशांना दाखवला. त्यावेळी एका महिलेने तिला ओळखले. ही मुलगी याच डब्यात होती, असे तिने सांगितल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी डब्यातील उजव्या बाजूचे शौचालय आतून बंद होते. आवाज दिल्यानंतररही ते उघडले गेले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी बाहेरून प्रयत्न करत अखेर शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये १३ वर्षीय मुलगी आढळून आली. या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती समाधानकारक उत्तरे देत नव्हती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी केरळमधील कन्नूर येथील पोलिसांशी संपर्क केला तेव्हा विकी नामक तरूण लग्नाचे आमिष दाखवून तिला राजस्थानला पळवून नेत असल्याची माहिती दिली.

मुलीला ताब्यात घेण्यासाठी कन्नूरचे पोलीस येईपर्यंत वेळ लागण्याची शक्यता असल्याने या मुलीला सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिला तूर्त ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांची शोधमोहिम सुरू झाल्यानंतर या मुलीसोबत असलेले लोक पोलिसांची नजर चुकवून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तेथून पसार झाले. विकीनामक तरूणाचाही त्यामध्ये समावेश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून एर्नाकुलम ओखा एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा तब्बल १९ मिनिटे जास्त रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. ग्रामीण निरीक्षक विनीत चौधरी, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक अजित मधाळे, उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके, सहाय्यक उपनिरीक्षक आर.एस. खांडेकर, प्रधान आरक्षक दिपक टिंगरे, आरक्षक पांडुरंग उप्पलवाड यांच्यासह ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक संदीप काशिद, वैभव मोरे, सुजाता रेवाळे, अमिता पाटील, सुदेश शिंदे इत्यादींनी या मोहिमेत सहभाग घेतला.

वाचा-  कोरोनाच्या निर्बंधांमुळे ताडी व्यावसायिक आर्थिक विवंचनेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button