Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी…’; भाजपच्या खेळीवर शिवसेनेचा प्रहार

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकीय नाट्य सत्ताबदलानंतरही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा कयास लावला जात होता. मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या या खेळीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत टीका करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘शिवसेनेत बंडाळी घडवून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची हेच या नाट्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार त्यातील पात्रांनी आपापली भूमिका वठवली. सुरत, गुवाहाटी, सर्वोच्च न्यायालय, गोवा, राजभवन आणि सर्वात शेवटी मंत्रालय अशा ठिकाणी त्याचे वेगवेगळे प्रयोग सादर झाले. मात्र सर्वात धक्कादायक असा क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी राजभवनात या नाटकाचा शेवटचा वगैरे वाटणारा प्रयोग झाला तेव्हा. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले.’

‘…तर ही वेळ आली नसती’

भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला दिलेलं आश्वासन न पाळल्यानेच आम्ही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका शिवसेनेकडून वारंवार मांडली जाते. याच भूमिकेचा ‘सामना’तून पुनरुच्चार करण्यात आला आहे. ‘मन आणि अपराध यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे. काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठ्या मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

राजकीय नाट्याचे आणखी किती अंक बाकी आहेत?

‘महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाट्य घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काही सांगू शकेल असे वाटत नाही. घडामोडीच अशा घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत की, राजकीय पंडित, चाणक्य व पत्रपंडितांनीही डोक्याला हात लावून बसावे. स्ट्रोक-मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग सादर केले गेले. एक पडदा पडला की दुसरा पडदा वर असेही प्रकार झाले. या संपूर्ण राजकीय नाट्याची पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या तथाकथित ‘महाशक्तीं’चा ‘पर्दाफाश’ही मधल्या काळात झाला. निदान त्यानंतर तरी हे नाट्य संपुष्टात येईल असा काहींचा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही. उलट या नाट्यात आणखी रंग भरण्याचे काम होताना दिसत आहे,’ अशी शंकाही ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button