TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

‘विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही, कारण…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

अकोला :एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर काही आमदारांनी बंडखोरी करत २० जून रोजी रात्री थेट सूरत गाठलं आणि राज्याच्या राजकारणात सत्तानाट्य सुरू झालं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यास यंदा आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, याची राज्यभरात चर्चा सुरू होती. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळवलं आणि राजकीय नाट्य संपुष्टात आले. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच विठुरायाची पूजा करणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

‘यंदा विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे करणार आहेत. मात्र शासकीय पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचं सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे. कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास मग सर्व काही समोर येणार आहे. मात्र भाजपच्या देवेंद्र फडणवीसांवर पांडुरंग का नाराज आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे,’ असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

‘काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री करणार, असं सुचवलं होतं. परंतु आता विठ्ठलानं एकनाथाला बोलावलं. त्यामुळे आता सरकार नेमकं भाजपचं की शिवसेनेचं आहे, याचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावं,’ असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button