TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी राज्याच्या राजकीय परंपरेला धक्का देणारी घटना

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी राज्याच्या राजकीय परंपरेला धक्का देणारी घटना घडली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना शिवीगाळ करत भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेनंतर राज्यभरातून टीका केली जात असताना आज शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करत आक्रमक इशारा दिला आहे.

‘महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे. पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ये तो एक ट्रेलर था, अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे?’ असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. तसंच सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ‘सामना’तून देण्यात आला आहे.

‘अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली, अन्यथा…’
शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दोन लोकप्रतिनिधीच एकमेकांना भिडल्याचे अभूतपूर्व चित्र महाराष्ट्राला पाहावं लागलं. याबाबत भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘दोन्ही बाजूंचे एकेरीवर तर आलेच; मग मोठी गुद्दागुद्दीही झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून पुढील भयंकर प्रकार टळला अन्यथा विधिमंडळाच्या आवारात काय घडले असते हे कोणीच सांगू शकणार नाही. असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील.’

‘हा साथीचा आजार आता मुंबईतही पसरला’
बंडखोर शिंदे गटावर टीका करत असताना शिवसेनेनं केंद्रातील भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्यांचे सध्या एकच धोरण आहे. एकतर विरोधकांना देशाचे शत्रू ठरवायचे, बोली लावून त्यांना खरेदी करायचे आणि ऐकलेच नाही तर फुटकळ प्रकरणात चौकशा लावून त्यांना तुरुंगात डांबायचे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा देशाच्या राजधानीतून आलेला हा साथीचा आजार आता गुजरात-आसाम रिटर्न सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या राजधानीतही पसरला नसता तरच नवल. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून जी धुमश्चक्री घडवली गेली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती अशी की, सुरळीत राज्यकारभार करण्यावर या सरकारचा विश्वास दिसत नाही,’ असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून शिवसेनेनं केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button