TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा

मुंबई : दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरवर कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारच्या मेगाब्लॉकमधून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी ११. ५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील जलद लोकल सेवा धिम्या मार्गावर वळण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) -कल्याण, कसारा, खोपोली या मुख्य मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावतील. हार्बरवरही कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ पर्यंत गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन स्थानकांदरम्यान डाऊन जलद लोकल धिम्या आणि अप धिम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. येत्या रविवारी मात्र मेगाब्लॉक नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

रेल्वे पोलिसांचे ट्विटर खाते ‘हॅक’

मुंबई : रेल्वे पोलिसांचे अधिकृत ट्विटर खाते ‘हॅक’ झाले आहे. विशेष म्हणजे रेल्वे पोलीस यंत्रणेला ही बाब तब्बल १६ दिवसांनी समजली असून आता हे खाते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि रेल्वे पोलिसांची चांगली कामगिरी, महत्त्वाच्या सूचनांची माहिती देण्यासाठी रेल्वे पोलिसांचे ट्विटर खाते आहे.  @grpmumbai असे हे खाते आहे. १२ ऑक्टोबर रोजी या खात्यावर विदेशी कंपनीच्या जाहिराती आणि अन्य संदेश ट्वीट होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र याची कल्पना रेल्वे पोलिसांना आली नाही. तब्बल १६ दिवसांनंतर खाते हॅक झाल्याची माहिती मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाकडून दिली.

ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न..

@grpmumbai हे खाते हॅक झाल्याचे लक्षात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया या खात्यावरील कुठल्याही माहितीकडे लक्ष देऊ नका. खात्याचा ताबा परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत प्रश्न व तक्रारी  @cpgrpmumbai अथवा १५१२ क्रमांकावर कळवू शकता. तसेच अधिकृत ‘जीआरपी’च्या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्वीट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button