कडक लॉकडाऊन लागू केल्याने नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या निम्म्यावर
अहमदनगर – नगर जिल्ह्यात दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे जिल्ह्यातील वाढत चाललेली रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४५८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. शनिवारी दिवसभरात २५८ नवे रुग्ण आढळले. तर सक्रिय रुग्णांची संख्या २,४३९ इतकी आहे. शनिवारी जिल्ह्यात ३७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह कोरोनामुक्तांची एकूण संख्या ३ लाख ४२ हजार ४८७ झाली आहे. तर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.३३ टक्के झाले आहे.
शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी लॅबमध्ये ८५, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत १३९ व अँटिजन चाचणीत ३४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४२ हजार ४८७ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या एकूण २ हजार ४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण असल्याने लॉकडाऊन जाहीर केले होते. आठवडाभरानंतर पुन्हा या गावांचा आढावा घेत काही गावांतून लॉकडाऊन मागे घेण्यात आला. सध्या २१ गावांमध्ये रुग्णसंख्या दहापेक्षा अधिक असल्याने लॉकडाऊन आहे.