breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक, कोल्हापुरच्या मूक मोर्चात सतेज पाटलांचा विश्वास

कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी १६ जून रोजी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भर पावसातही अनेक समर्थक मोर्चाला पाठिंबा देत आहेत. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित असून यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत भूमिका मांडली. सतेज पाटील यांनी यावेळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचं आवाहन केलं.

“संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे हे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारला एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण आपली भेट घेतील. राज्य सरकार सकारात्मक असून तुमच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आपण उद्याची वेळ देऊन मुंबईला यावं,”अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून पाठिंबा देणं आमची जबाबदारी असून राज्य सरकारची भूमिका सांगणं कर्तव्य आहे. संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठबळ मिळावं अशीच आमची भूमिका आहे असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं.

“२३ मार्च २०१४ ला राणे कमिटीने पहिला अहवाल दिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तांत्रिकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून घेण्यात आली. त्यानंतर सरकारने गायकवाड आयोग नेमला. त्यांना राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची परिस्थिती, अडचणी यासंबंधी डेटा तयार केला. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हे आरक्षण पुढे यावं असे सुतोवाच हायकोर्टात झालं होतं. त्यादृष्टीने सर्वानुमते राज्य शासनाने गायकवाड आयोग नेमला आणि २०१८ साली हा कायदा पारित केला पण दुर्दैवाने हायकोर्टात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही,” असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं.

“गेल्या सहा वर्षातील संघर्षात राज्य सरकार, आमदार किंवा खासदार म्हणून आमची भूमिका सकारात्मकच राहिली आहे. हा प्रश्न संयमाने सुटला पाहिजे अशी भूमिका आपण सर्वांनीच सातत्याने घेतली आहे. कोरोनाच्या संकटात संयमाने आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याबद्दल मला संभाजीराजेंचेही आभार मानायचे आहेत. सध्याच्या परिस्थितीत आंदोलनाची दिशा योग्य राहिली पाहिजे आणि उद्धिष्ट्य साध्य झालं पाहिजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे,” असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं.

“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने तात्काळ दिलीप भोसले यांच्या नेतृत्वात कमिटी नेमली. विधीमंडळात सर्वानुमते ठराव पास झाला असताना राज्य सरकार कमी पडलं बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नव्हती हेदेखील सर्वांना कळणं गरजेचं आहे. जी टीम गेल्या पाच वर्षांपासून होती तीच कायम ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती,” असं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं.

“दिलीप भोसलेंचा अहवाल आला असून त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण पंतप्रधानांना भेटले आणि चर्चाही केली. त्यामुळे भविष्यात आता केंद्र आणि राज्य सरकारमधील समनव्याची जबाबदारी आता संभाजीराजेंवर असणार आहे,” असं सतेज पाटील यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button