विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर विजय हजारे स्पर्धेत उतरणार; दिल्ली संघासाठी मोठी भर

Virat Kohli | भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमधील ही महत्त्वाची स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होत असून, विराटने स्वतःला निवडीसाठी उपलब्ध असल्याची माहिती डीडीसीएला दिली आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनीही याची अधिकृत पुष्टी केली.
विराट कोहलीच्या पुनरागमनाचे वेळेचे विशेष महत्त्व आहे. तो सध्या फक्त वनडे स्वरूपात खेळतो. २०२७ वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने येणाऱ्या काळात फारच कमी आंतरराष्ट्रीय वनडे मालिकांचा समावेश असल्यामुळे डोमेस्टिक क्रिकेट खेळणे अनिवार्य ठरत आहे. बीसीसीआयने यंदा जानेवारीतच करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे बंधनकारक केले आहे.
हेही वाचा : “महाराष्ट्रात निवडणूक काळात पाण्यासारखे पैसे वाटले”; सुप्रिया सुळेंचा आरोप
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतात परतलेल्या विराटने रांची येथे सरावाचा धडाका लावत पहिल्या वनडेत दमदार शतक ठोकले. त्यानंतर त्याने विजय हजारे स्पर्धेत उतरण्यासंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही विराट व रोहित शर्मा यांनी फिटनेस व फॉर्म सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा खेळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
२०१० नंतर प्रथमच विराट या स्पर्धेत खेळणार आहे. त्यावेळी तो सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात दिसला होता.
या वर्षी दिल्लीचा संघ २४ डिसेंबर ते ८ जानेवारीदरम्यान आंध्र प्रदेश, गुजरात, सौराष्ट्र, ओडिशा, सर्व्हिसेस, रेल्वे आणि हरयाणा यांच्याविरुद्ध सामने खेळणार आहे. विराट नेमके किती सामने खेळणार याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. विराटच्या सहभागामुळे दिल्ली संघाला मोठा अनुभव मिळणार असून युवा खेळाडूंनाही मार्गदर्शनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.




