“महाराष्ट्रात निवडणूक काळात पाण्यासारखे पैसे वाटले”; सुप्रिया सुळेंचा आरोप

Supriya Sule | नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि अनेक न्यायालयीन व राजकीय अडथळे पार करत अखेर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. २ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. मात्र या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप पुन्हा एकदा जोरात झाले आहेत. विरोधकांनी अनेक ठिकाणी पैशांची उधळपट्टी झाल्याचे आरोप केले असून काही ठिकाणी निवडणूक आयोगाने थेट कारवाईही केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय ते भीषण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पारदर्शक कारभाराचा दावा करत असतात. पंतप्रधान सतत आश्वासन देत असतात की आम्ही देशताला सगळा काळा पैसा हद्दपार करू. भ्रष्टाचारमुक्त भारत करू. देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचं आणि त्यांच्या विचाराचं सरकार आहे. तरी या सरकारमध्ये पाण्यासारखे पैसे वाटले जात आहेत.
हेही वाचा : “युरोपला युद्ध हवं असेल तर आम्ही तयार”; व्लादिमीर पुतिन यांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदी केली होती. काळा पैसा रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. तरी देखील महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा कुठून येतात? दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका मंत्र्यांच्या घरात पैशाने भरलेली बॅग सापडली होती. त्याची चौकशी झाली का? चौकशी केली असेल तर ते पैसे कुठून आले होते हे समजलं का? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काल एका ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीत मतदारांना वाटले जाणारे पैसे पकडले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांनी हा प्रकार सर्वांसमोर आणला. मी संसद परिसरात मंत्री नारायण राणे यांना भेटले. तेव्हा त्यांच्याजवळ मी निलेश राणे यांचं कौतुक केलं. तुमच्या मुलाने चांगलं काम केलं असं त्यांना सांगितलं. तुमच्या मुलाने मोठी हिंमत दाखवली चोरी पकडली आहे. मात्र, आता निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब खूप दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात नेमकं काय चाललंय? निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर प्रश्न पडला आहे की नेमका कोणावर विश्वास दाखवायचा. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की काहीतरी करा. कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस होता. महिला अत्याचार, लेकींच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर कालचा दिवस खूप अस्वस्थ करणारा होता, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.




