रिंकू सिंहची ऐतिहासिक खेळी; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Rinku Singh | आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा उपकर्णधार रिंकू सिंह याने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय मिळवून दिला. सलग दुसऱ्या सामन्यात रिंकूने निर्णायक खेळी करत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
केकेआरची अवस्था ६.१ षटकांत ४ बाद ३१ धावा अशी असताना रिंकू फलंदाजीला आला. संघ पूर्णपणे दबावाखाली असताना त्याने संयम राखत जबाबदारी स्वीकारली. एका टोकाकडून सातत्याने विकेट्स पडत असतानाही रिंकूने खेळपट्टीला साजेशी सावध आणि आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला.
हेही वाचा
शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा
रिंकूने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे केकेआरने १५५ धावांपर्यंत मजल मारली, जो त्या परिस्थितीत स्पर्धात्मक स्कोअर ठरला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये केकेआरने विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला.
अखेरच्या २०व्या षटकात रिंकूने सलग ४ षटकार ठोकत संघाची धावसंख्या वाढवली. या कामगिरीसह आयपीएल इतिहासात २०व्या षटकात दोन वेळा षटकारांची आतिषबाजी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
रिंकूची ८३ धावांची खेळी ही आयपीएल इतिहासात पाचव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर येऊन केलेल्या सर्वोच्च धावसंख्यांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्ससाठी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली असून या यादीत आंद्रे रसेल अव्वल स्थानावर आहे.





