WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी सुरूवात; गुजरातचा १४३ धावांनी पराभव

हरमनप्रीतची ३० चेंडूत ६५ धावंची तुफानी खेळी
WPL 2023 : महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरूवात झाली आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतने शानदार तुफानी अर्धशतकी खेळी केली. यासह मुंबईने महिला प्रीमिअर लीगची चांगली सुरूवात केली आहे.
गुजरातने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करत ऐतिहासिक धावसंख्या उभारली. मुंबईने २० षटकांत ५ विकेट गमावत २०७ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने ३० चेंडूत ६५ धावंची तुफानी खेळी केली. तर अमेलियाने २४ चेंडूत ४५ धावा केल्या.
गुजरात संघाने प्रत्युत्तरात सुरूवात खराब झाली. अवघ्या पाच धावांत त्यांनी ३ विकेट्स गमावल्या त्यात हरलीन आणि गार्डनर या शुन्य धावांवर बाद झाल्या. कर्णधार बेथ मूनी तिसऱ्याच चेंडूवर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेली. द्यालन हेमलता सोडल्यास कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. तिने २३ चेंडूत २९ धावा केल्या. ठरावीक अंतरावर विकेट्स गमावल्याने अवघ्या ६४ धावांत गुजरातची फलंदाजी संपुष्टात आली.
मुंबईकडून सायका इशाकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. नेट सायव्हर-ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी २ विकेट्स घेत तिला साथ दिली. तर वेगवान गोलंदाज इस्सी वोंगला देखील १ विकेट घेण्यात यश मिळाले.





