रोहित अन् विराट परतले! भारत-इंग्लंड पहिला वनडे सामना आज; जाणून घ्या वेळ..

IND vs ENG ODI Series | इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० अशा दारूण पराभवाचा सामना करावा लागला. (मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता). आता या पराभवाचे दुःख विसरून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय (वनडे) सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गज व अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेची सुरुवात आज, १३ जुलैपासून होत आहे. टी-२० मालिकेतील सामने संध्याकाळी ७:०० आणि रात्री १०:०० वाजता सुरू झाले होते, मात्र वनडे मालिकेची वेळ वेगळी असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. हा सामना बर्मिंगहॅमच्या प्रसिद्ध ‘एजबॅस्टन’ मैदानावर खेळवला जाणार आहे.
या वनडे मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा युवा फलंदाज शुबमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यर सांभाळणार आहे. अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ मजबूत दिसत असला, तरी टी-२० मालिकेत ४-० असा एकतर्फी विजय मिळवून आत्मविश्वासाने भारलेल्या इंग्लंड संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हॅरी ब्रूक करणार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.
हेही वाचा
अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
भारत – इंग्लंड वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक:
- पहिला वनडे सामना: १३ जुलै, बर्मिंगहॅम (दुपारी ३:३० वाजता)
- दुसरा वनडे सामना: १६ जुलै
- तिसरा वनडे सामना: १९ जुलै
लाईव्ह मॅच कुठे पाहायची?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा रोमांचक सामना क्रिकेट चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) या टीव्ही वाहिन्यांवर थेट पाहता येईल. तसेच, मोबाईल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे.
भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.





